संग्रहित फोटो
पुणे : थेऊर परिसरात पार्क केलेल्या एका टेम्पोतून तब्बल ४९५ किलो तांब्याच्या तारा चोरणार्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. या तारांची बाजारात ३ लाख एवढी किंमत आहे. व्यापाऱ्याने पोलिसांचे आभार मानले असून, या भागातील वाढत्या चोऱ्यांसाठी बंदोबस्त वाढविण्याबाबत नागरिकांनी पोलिसांना विनंती केली आहे.
सुरज शाम जाधव (वय १९), यश अजित सावंत (वय २१), महेश बसवराज पुजारी (वय २२, रा. सर्व. चव्हाणवस्ती, थेऊर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत समाधान हिराजी डोंगरे (रा. थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. ६ जून रोजी रात्री ११ वाजता थेऊर भागात ही घटना घडली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
डोंगरे यांनी त्यांचा टेम्पो थेऊर गावातील जय मल्हार हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत उभा केला होता. टेम्पोत जुन्या आणि जळालेल्या तांब्याच्या तारांचे एकूण ५५ पोते भरलेले होते. परंतु, रात्रीत अज्ञात चोरट्यांनी हे बंडल चोरून नेले. दुसऱ्या दिवशी (दि. ७ जून) सकाळी पाहीले असता चोरीला गेल्याचे दिसून आले. या पोत्यांमध्ये एकूण ४९५ किलो वजनाच्या आणि अंदाजे ३ लाख १ हजार ९५० रुपयांच्या तांब्याच्या तारांचा समावेश होता. याप्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिली.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके गठीत करण्यात आली. तांत्रिक तपासावरून अंमलदार प्रदीप गाडे, राहुल कर्डीले यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानूसार तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.