संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नाही. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील लोहगाव भागात रिक्षाचालकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल संच व रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रतिक शिवाजी असवरे (वय २०, रा. चिंचगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि पवन तानाजी माने (वय २०, रा. वृंदावन पार्क, लोहगाव) यांना ताब्यात घेतले असून, त्यांचा साथीदार निखील खोबरे (वय २२, रा. पठारे वस्ती, चऱ्होली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शुभम मारुती वाळुंज (वय २७, रा. आनंद पार्क, भैरवनगर, धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाळुंज रिक्षाचालक असून, १५ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास लोहगाव भागात थांबला होता. त्याच्याबरोबर मित्र आकाश पवार देखील होता. त्यावेळी आरोपी असवरे, माने आणि साथीदार तेथे आले व वाळुंज व त्याच्या मित्राला बांबूने मारहाण केली. त्यांनी वाळुंजकडून दोन मोबाईल संच आणि पाच हजार रुपये असा मुद्देमाल लुटून पसार झाले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत पसार झालेल्या आरोपींना अटक केली. पोलीस हवालदार आदलिंग या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील आयटी इंजिनिअर दाम्पत्याची फसवणूक; तब्बल सव्वा कोटींना घातला गंडा
अत्याच्या पतीवर पाठलाग करून कोयत्याने हल्ला
मुलाला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे मुलाला भेटण्यावरून वाद झाला. या वादानंतर मेव्हण्याच्या मुलाने व त्याच्या साथीदारांनी अत्याच्या पतीवर पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राजू दत्तू जगताप (वय ६२, रा. किरकटवाडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी प्रसाद भारत निकाळजे (वय १८), समीर इंद्रजीत थापा (वय २८) आणि यश विनोद निकाळजे (वय २३, रा. चंदननगर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.