File Photo : Crime
छत्रपती संभाजीनगर : जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : मुंबईत चाललंय तरी काय? एक वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, परळमधील धक्कादायक प्रकार
दिनेश उर्फ बबलू मोरे याची हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती दिली जात आहे. या हत्येची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी घाटी रूग्णालयात धाव घेत एकच टाहो फोडला होता. जुन्या भांडणाच्या कारणावरुन हा खून झाला आहे. त्या भांडणाचे कारण काय होते हे मात्र अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
याप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश मोरे हा सोमवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास हर्मूल मध्यवर्ती कारागृहासमोरील मोकळ्या मैदानावर मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. यावेळी दिनेशचा एका तरुणासोबत जुना वाद होता. तो या ठिकाणी आला. दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन बाचाबाचीला सुरुवात झाली. यावेळी समोरील आरोपी तरुणाने स्वतःसोबत आणलेल्या धारदार हत्याराने दिनेशवर वार केले. त्यामुळे दिनेश जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
दरम्यान, मित्रांनी त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी दिनेशला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बेगमुपरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दिनेशचे 12 डिसेंबर रोजी होते लग्न
दिनेश उर्फ बबलू याचा सहा महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. 12 डिसेंबर रोजी बबलूचे लग्न होते. मात्र, त्यापूर्वीच बबलूचा खून झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बबलूचा मित्रपरिवार मोठा होता. बबलूचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली.
पुण्यात टोळक्याकडून दाम्पत्याला मारहाण
कात्रज परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोणतेही कारण नसताना दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. संतोष नगर परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात संतोष नगर येथील तिरुपती कॉलनी येथे राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime: पुण्यनगरीत वाढली टोळक्यांची दहशत; कात्रजमध्ये जोडप्याला विनाकारण बेदम मारहाण…