मुंबईत चाललंय तरी काय? एक वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार , परळमधील धक्कादायक प्रकार (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime news Marathi: राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दररोज लैंगिक अत्याचाराच्या किमान एक-दोन घटना माध्यमांमध्ये ऐकायला मिळतात. सर्वाधिक अत्याचाराचे गुन्हे मुंबईत दाखल असून दुसऱ्या क्रमाकांवर ठाण्याचा क्रमांक लागतो. गेल्या चार महिन्यांत मुंबईत 226 अत्याचाराचे गुन्हे दाखल असून ठाण्यात 118 तर पुण्यात 112 अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. ही धक्कादायक माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे. असे असताना आज ( 4 डिसेंबर ) मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येत आहे.
मुंबईतील परळ भागात एक वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेतील आरोपी संतोष गौतम (27) या नराधमाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली.
अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली असून, अल्पवयीन मुलीशी मैत्री करण्यास प्रवृत्त करून तिच्या मित्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच 53 वर्षांच्या परिचित व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी अंधेरीमध्ये राहत असून शिक्षण घेत आहे. याच परिसरात आरोपीही राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिची सुमित नावाच्या तरुणाशी ओळख करून दिली.
सुमितशी गप्पा मारत असताना त्याने या दोघांचे मोबाईलवर व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ पालकांना दाखवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार समजल्यानंतर तिच्या पालकांनी डी. एन. नगर पोलिसांकडे तक्रार दिली.
गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.