सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : नसरापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील ‘तो’ सीसीटीव्ही निर्णायक ठरल्याची बाब समोर आली आहे. त्या सीसीटीव्हीत आरोपी पिडीत चिमुकलीला घेऊन जाताना कैद झाला नसता तर हे प्रकरण आणखीही वेगळ्या दिशेला जाण्याची शक्यता नाकरता येत नव्हती. कारण, आरोपी नराधम मोबाईलही वापरत नसल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात तो सीसीटीव्हीच महत्वाचा ठरला आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे या ६५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पुर्वी दोन गुन्ह्यातून निर्दोष सुटका झालेल्या भीमराव कांबळे मोबाईलच वापरत नव्हता. तो शेतीची तसेच इतर कामे करत होता. भोर तालुक्यातील गावोगावी तो ही कामे करत होता. नसरापूर येथेही तो काही दिवसांपासून कामे करत होता. गंभीर गुन्ह्यात तांत्रिक तपास महत्वाचा भाग झाला आहे. मोबाईल हे त्यातील महत्वाचा भाग आहे. न्यायालयातही पोलिस या मोबाईलचा पुरावा म्हणून वापर करतात. दुसरा तांत्रिक तपास सीसीटीव्हीवर असतो. मोबाईल आणि सीसीटीव्ही नसल्याने अनेक प्रकरणात पोलिसांचा तपास भरकटतो किंवा त्याला काही दिवसांचा अथवा महिन्यांचा कालावधी लागतो. अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत.
चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू केला, पण तब्बल दीड तासानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आणि नसरापूरमधील खासगी सीसीटीव्हीही पडताळण्यास सुरूवात केली. तांत्रिक तपास सुरू केला. पण तांत्रिक तपासात गती नव्हती. त्याचवेळी एका ठिकाणी सीसीटीव्हीत आरोपी व चिमुकली पायी गोठ्याकडे जाताना दिसून आले आणि तपासाला वेग आला. आरोपीला काही ग्रामस्थांनी ओळखले. लागलीच त्याचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी एका ठिकाणी मिळून आला.
नराधमाचा दावा अन् पोलिसांचा हलगर्जीपणा
नराधम भीमराव कांबळे याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला प्रश्न विचारला. तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का असे विचारल्यानंतर निलर्जपणे त्याने “मला किरकोळ मारामारीसाठी गोवण्यात आले आहे”, असे म्हंटले. दुसरीकडे पोलिसांचा हलगर्जीपणा देखील समोर आला आहे. आरोपीला हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी न्यायालयासमोर सादर केली पण त्यात आरोपी कांबळेच्या मागील गुन्ह्याची माहितीच नव्हती. आरोपीचे जुने गुन्हे न टाकल्याने न्यायालय पोलिसांवर नाराज झाले. पोलिसांना १५ मिनिटांचा वेळ दिला. नंतर पोलिसांनी तातडीने रिमांडची कॉपी बदलली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हे सुद्धा वाचा : कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्…
सौम्य लाठीचार्ज ?
रुग्णावाहिकेतून चिमुकलीचा मृतदेह अत्यंसंस्कारासाठी घेऊन जात असताना नवले ब्रिज परिसरात आल्यानंतर अचानक सायंकाळी साडे सहाच्या सुमारास रुग्णवाहिका थांबवून तिचे दार उघडत काही जणांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला मोठे स्वरूप निर्माण झाले आणि पुणे-बेंगलोर महामार्ग ठप्प झाला होता. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानंतर चहूबाजूने वाहनांच्या रागांच रांगा लागल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे ज्येष्ठ वकिल उज्वल निकम यांच्याशी बोलणे देखील करून दिले. साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला केले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा प्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे. आम्ही मृत मुलीच्या आई-वडिलांना समजावून येथून बाहेर काढल्याचा दावा अमितेश कुमार यांनी केला. जवळपास चार ते साडेचार तास रास्ता रोको केला होता.






