ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या भाच्याने आत्याच्या डोक्यात घातली सांडशी; पैशांना नकार देताच केलं कृत्य (संग्रहित फोटो)
जळगाव : मोबाईलवरील फ्री फायर गेमसाठी आत्याने पैसे दिले नाहीत म्हणून भाच्याने डोक्यात सांडशी मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हलीमा बी अब्दुल रशीद (रा. ख्वाजा नगर, रेल्वे टाकी लाईन) ही घरी असताना तिचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिच्याकडे ‘मला पैसे लागणार आहेत. पैसे दे नाहीतर तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही’, अशी धमकी दिली. तेव्हा त्याच्या वडिलांनी सकलैन मोहिद्दीन पिंजारी याला सहा हजार रुपये लागतील, असे सांगितले. मात्र, मुलाने दहा हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले. ‘माझ्याकडे पैसे नाही’ असे हलीमाने सांगताच सकलैन याने सांडशीने तिच्या डोक्यात मारले आणि तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिने अत्याचार; 46 वर्षीय व्यक्तीने ॲसिड हल्ल्याची धमकी दिली अन्…
दरम्यान, त्याच्या वडिलांनी भांडण सोडवून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले होते. उपचार घेऊन आल्यानंतर अमळनेर पोलिस स्टेशनला सकलैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईलमधील फ्री फायर गेमसाठी पैसे मागत असल्याचे आरोपीने सांगितले.
चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकूने वार करून जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.