संग्रहित फोटो
पिंपरी : लोणावळ्यातील भूशी धरण परिसरात रविवारी (२९ जून) संध्याकाळी दारूच्या नशेत भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकाने रस्त्याच्या कडेला बसून गप्पा मारत असलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला मारहाण करून त्याच्या कारला आग लावली.
कार्तिक उल्हास चिंचणकर (२०, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव बुद्रुक, मावळ) याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर अयान मोहम्मद शेख (१७) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात करणाऱ्या कारचा चालक तुळशीराम रामपाल यादव (३२, रा. अँटॉप हिल, वडाळा, मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना सोमवारी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता मिस्टी मेडोज हॉटेलजवळ घडली. युपी ८० डीसी ९००० क्रमांकाची भरधाव कार रस्त्याच्या कडेला बसलेल्या तरुणांवर आदळली. धडक एवढी जोरदार होती की कार्तिकचा जागीच मृत्यू झाला, तर अयान गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या प्रत्यक्षदर्शींना चालक दारूच्या नशेत असल्याचे लक्षात येताच परिसरात तणाव निर्माण झाला. जमावाने चालकाला पकडून मारहाण केली आणि कार पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, जखमींना रुग्णालयात हलवले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले.