सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरातील पब, बार, रूफटॉप रेस्टॉरंट आणि हॉटेल्सवरील पोलिसांच्या वाढत्या कारवायांमुळे ‘पार्टी कल्चर’ने आता नवीन मार्ग शोधल्याचे चित्र आहे. शहराच्या हद्दीत नियमांचे पालन, कारवाईचा ससेमिरा, यामुळे या कार्यक्रम आयोजित करणे कठीण होत असल्याने आता पुण्याच्या वेशीवरील फार्महाऊस, रिसॉर्ट्स आणि खासगी बंगल्यांकडे कल वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. तुळापूर येथे उघडकीस आलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ प्रकरणानंतर या वाढत्या ‘हाऊस पार्टी’ संस्कृतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण भागासह पोलिस आयुक्तांच्या हद्दीत दाखल झालेल्या हद्दीतील ओपन हॉटेल्स, बंगलो आणि रिसार्टवर अशा पार्ट्या मठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात तुळापूरसह वाघोली, मुळशी, पवना धरण परिसर आणि लोणावळा, खडकवासलाचा बॅक वॉटर भाग अशा पार्ट्यांसाठी आयोजकांच्या पसंतीचे केंद्र बनत असल्याचे दिसत आहे. शहरापासून कमी अंतर, एकांतातील जागा, मोठे फार्महाऊस आणि रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम घेण्याची मुभा मिळत असल्याने अशा ठिकाणांची निवड केली जात असल्याचे म्हणणे आहे.
दारू बाहेरून घेऊन जायचे आणि जेवणाची ऑर्डर तिथे द्यायची, अशा पद्धतीने या पार्ट्यांचे आयोजन होत आहे. विशेष म्हणजे, पहाटेपर्यंत हे हॉटेल्स सुरू राहतात. आजू-बाजूला वस्तू नसल्याने त्याची तक्रार होत नाही. आणि पोलिसांचे लक्षही नसते. पण हप्त्याचा खेळ मात्र या हॉटेल्समधून सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोशल मीडिया, खासगी ऑनलाइन गट, इन्स्टाग्राम पेजेस आणि डिजिटल निमंत्रणांच्या माध्यमातून अशा पार्ट्या तसेच काही मित्र परिवार याठिकाणी एकत्रित रित्या जात असल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते, तर काही ठिकाणी ‘इन्व्हिटेशन ओन्ली’ पद्धतीचा वापर केला जातो. माहितीनुसार, अशा कार्यक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी व विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कार्यरत तरूण-तरुणी सहभागी होत असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये मद्यपान, हुक्का सेवन आणि काही प्रकरणांत अमली पदार्थांच्या वापराचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांकडे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे विशेष लक्ष लागले आहे. तुळापूरमधील अलीकडील कारवाईनंतर शहरालगतच्या भागांतील रिसॉर्ट्स, फार्महाऊस आणि खासगी कार्यक्रमस्थळांची तपासणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून परवानग्या, ध्वनिप्रदूषणाचे नियम, मद्यविक्रीसंबंधी अटी व सुरक्षाविषयक उपाययोजनांची छाननी केली जाणार आहे. शहरातील कारवाईनंतर ग्रामीण भागात सरकलेले हे ‘हाऊस पार्टी’चे जाळे आता रडारवर आले आहे.
हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो तयारी ठेवा, महापौरांनी मागविला अहवाल; सेव्ह वॉटर मोहीम राबविणार
सोशल मीडियावरून प्रसिद्धी
कार्यक्रमांची माहिती प्रामुख्याने सोशल मीडिया, खासगी ऑनलाइन गट आणि डिजिटल निमंत्रणांच्या माध्यमातून दिली जाते. यापूर्वी झालेल्या विविध कारवायांमध्ये मद्य, हुक्का आणि काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापराच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या पार्ट्यांवर नजर ठेवली जात आहे.






