संग्रहित फोटो
पुणे : कंत्राटदाराची प्रलंबित बिले मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या बारामती एमआयडीसी एसटी डेपोचे वाहतूक नियंत्रक तथा एसटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालक अनिल बनकर याला एसीबीने रंगेहात पकडले आहे. चार लाख रुपये स्वीकारताना बारामती एसटी स्टँड समोरील रस्त्यावर बनकर याला सापळा कारवाईत रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अनिल तुकाराम बनकर (वय ५१) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
तक्रारदाराने एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेतील फर्निचर नूतनीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे ४८.६० लाख रुपयांचे बिल झाले असून त्यापैकी ४० लाख रुपये मिळाले होते. उर्वरित ८.६० लाख रुपये तसेच इतर किरकोळ कामाचे ४.९८ लाख रुपये प्रलंबित होते. ही रक्कम मंजूर करून देण्यासाठी आणि संचालक मंडळाची मंजुरीची ऑर्डर बँकेत सादर करण्यासाठी बनकर यांनी सुरूवातीला ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. नंतर तक्रारदार तरुणाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. नंतर गुरुवारी बारामती एसटी स्थानकासमोरील रस्त्यावर सापळा रचला. बनकर याने चारचाकी वाहनात तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारताच पोलिसांनी त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
लाच घेताना कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याला फेरतपासणीनंतर पास झाल्याचा सुधारित मार्कमेमो देण्यासाठी ४,५०० रुपयांची लाच स्वीकारताना अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. गुरुवारी (दि. २३ जुलै) दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील २१ वर्षीय विद्यार्थ्याने एप्रिल २०२६ मध्ये बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा दिली होती. हिंदी विषयात तो नापास झाल्यानंतर त्याने नियमानुसार ३६० शुल्क भरून उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. फेरतपासणीनंतर निकाल आल्यानंतर महात्मा गांधी महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक गणेश भगवानराव सांडवे (वय ४५) यांनी विद्यार्थ्याला फोन करून, तुला पास केले आहे, असे सांगत सुधारित मार्कमेमो देण्यासाठी लाचेची मागणी केली. याबाबत विद्यार्थ्याने २१ जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.






