संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : पुणे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासोबतच बेशिस्तांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न होत असताना बेशिस्तांची संख्या मात्र, कमी होत नसल्याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. या कारवाईत सर्वाधिक कारवाई वन-वे तसेच नो-एंट्रीचे उल्लघंन करणाऱ्यांची असून, पोलिसांनी प्रमुख दहा प्रकारात कारवाई केली आहे. केवळ ६ महिन्यात शहरातील तब्बल ५ लाख ८९ हजार २६४ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. तर, गेल्या ५ वर्षांत २० लाख १३ हजार ९३९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
पुणे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जनजागृतीसोबतच विशेष मोहिम देखील राबविल्या जात आहेत. दुसरीकडे बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा वेग वाढविला आहे. मात्र, तरीही बेशिस्तांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने पोलिसांकडून शहरात हेल्मेट, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राइव्ह, मॉडिफाईड सायलेंसर, राँग साईड ड्रायव्हिंग आणि सिग्नल जंपिंगविरोधात कारवाई सुरू आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. परंतु, वाहनसंख्येबरोबरच वाहतूक शिस्तीचा अभाव कायम असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अपघाताची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण आहे. त्यातही अहिल्यानगर व सोलापूर महामार्गावर अपघात वाढल्याचे दिसून आले आहे.
सर्वाधिक कारवाई वन-वे आणि नो-एंट्रीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर झाली असून, अशा १० लाख ५७ हजार ९४४ प्रकरणांची नोंद आहे. त्यानंतर सिग्नल तोडण्याच्या ४ लाख ५ हजार १४६ घटना आढळून आल्या. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या २ लाख १ हजार ३९३, तर मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या १ लाख ४ हजार ७७३ चालकांवर कारवाई करण्यात आली.
याशिवाय राँग साईडने वाहन चालविण्याच्या १ लाख ४ हजार ७६३, काळ्या फिल्मच्या काचा लावण्याच्या ६५ हजार ३७४, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या १९ हजार ६२, धोकादायक वाहन चालविण्याच्या २२ हजार ४८४, फुटपाथवर वाहन चालविण्याच्या २१ हजार २६६ आणि फुटपाथवर पार्किंग करण्याच्या ११ हजार १२ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पाच वर्षांतील प्रमुख कारवाई
| नियमभंग | कारवाई | ५ वर्षातील आकडेवारी |
|---|---|---|
| नो-एंट्री / वन-वे उल्लंघन | ३४६३०० | १०,५७,९४४ |
| सिग्नल तोडणे | ९२०५५ | ४,०५,१४६ |
| ट्रिपल सीट | ५९६१२ | २,०१,३९३ |
| मोबाईलवर बोलत वाहन चालविणे | २५३१३ | १,०४,७७३ |
| राँग साईड ड्रायव्हिंग | १८२८० | १,०४,७६३ |
| काळ्या फिल्मच्या काचा | २०४९३ | ६५,३७४ |
| धोकादायक वाहन चालविणे | ६९१५ | २२,४८४ |
| फुटपाथवर वाहन चालविणे | ७५५९ | २१,२६६ |
| मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे | ६७९० | १९,०६२ |
| फुटपाथवर पार्किंग | ५९४७ | ११,०१२ |
| एकूण कारवाई | २०,१३,९३९ | |
नेमकी कारवाईत वाढ का?
नो-एंट्री आणि वन-वे उल्लंघन हे सर्वाधिक गंभीर आव्हान असून एकूण कारवाईंपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे या प्रकारातील आहेत. सिग्नल जंपिंग अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू असून अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख उल्लंघनांमध्ये त्याचा समावेश आहे. ट्रिपल सीट आणि मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याचे प्रकार सरास होत आहेत. पोलिसांच्या विशेष मोहिमा आणि ई-चलन प्रणालीमुळे कारवाई वाढली; मात्र वाहतूक शिस्तीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.






