सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी : महाराष्ट्रासह कर्नाटकातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या कागल येथील तिघांना अटक करण्यात आली आहे. अक्षय राजू शेलार (वय २४ मूळ रा. लिगाडे मळा इचलकरंजी), विनायक बाळू गवळी (वय २२ दोघे रा. बेघर वसाहत शाहूनगर कागल) व चंद्रदीप कुलदीप गाडेकर (वय २३ रा. संत रोहिदास चौक कागल) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून १० गुन्हे उघडकीस आले असून चोरीतील ८ लाखाच्या १४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्ह्यात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक रविंद्र कळमकर यांना सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकाद्वारे तपास सुरु असताना पोलिस अंमलदार सागर चौगले यांना कागल एसटी डेपो येथे तीन व्यक्ती चोरीतील दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने एसटी डेपो येथे सापळा रचून अक्षय शेलार, विनायक गवळी व चंद्रदीप गाडेकर या तिघांना पकडले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन व गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अधिक चौकशीत त्यांच्याकडून आणखीन १२ दुचाकी हस्तगत करत १० गुन्हे उघडकीस आणले.
या भागातून लांबविल्या गाड्या
या तिघांनी कबनूर, कागल, गोकुळ शिरगांव, इस्पुर्ली, कुरुंदवाड, निपाणी आदी भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ३, कागल पोलिस ठाण्यात २, गोकुळ शिरगांव, इस्पुर्ली, कुरुंदवाड, निपाणी ग्रामीण व बसवेश्वर पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे गुन्हे दाखल आहेत. या तिघांनाही शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.