संग्रहित फोटो
पुणे : भरदुपारी घरात घुसून कुटुंबाला सुरा दाखवत साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या तसेच भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या सख्या भावांची टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, सुरा व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीचे दौंड, बारामती, इंदापूर, सुपा, जेजुरी, शिरूर आणि रांजणगाव हद्दीतील १९ विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले (वय २४), सचिन ईश्वर भोसले (वय ३९), गहीनीनाथ ईश्वर भोसले (वय २९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, उर्वरित मिलन उर्फ मिलिंद भोसले, धोंड्या उर्फ युवराज भोसले, सोन्या भोसले यांची नावे समोर आली आहेत. त्यांनाही अटक केली. ही कारवाई अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण
दौंड येथे (दि. ११) दुपारी बोरीबेल येथील ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत (वय ४१) यांच्या घरी पाच जण दोन दुचाकींवरून आले. त्यांनी सावंत यांच्या खिशातून साडेसात हजार रुपये जबरदस्तीने काढले आणि सुरा मानेवर ठेवून घरातील कपाटातील तीन लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पसार झाले. सावंत यांनी एकूण तीन लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची तक्रार दौंड पोलिसांत दिली. या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तातडीने तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
शिरापूर परिसरात सापळा रचून पकडले
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला. संकपाळ यांना माहिती मिळाली की हा गुन्हा बेलगाव (कर्जत, अहिल्यानगर) येथील भोसले बंधूंनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी शिरापूर परिसरात सापळा रचून त्यांना पकडले.
२८ भाऊ; बहुतांशी गुन्हेगार
पोलिसांनी अटक केलेले पाचही आरोपी सख्खे भाऊ असून, त्यांचे वडील इश्वर भोसले यांना चार बायका असून, एकूण २८ मुलगे आहेत. यातील बहुतांशी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अशी माहिती अविनाश शिळीमकर यांनी दिली. या आरोपींनी पुणे ग्रामीणसह सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, बीड अशा जिल्ह्यांमध्ये सुमारे दिवसा घरफोड्यांचे ६० गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
दिवसा दरोड्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने स्थानिक गुन्हे शाखेसह दौंड पोलिसांची पथके नेमली होती. या गुन्ह्यात भोसले टोळीचा हात असल्याचे समोर आल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे टोळी पकडण्यात आली. यांना चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील.
– संदीपसिंग गिल (पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण)