सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळेगाव : बारामती-फलटण रोडवरील पावणेवाडी येथे भिमराव पिंगळे या व्यक्तीला मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय चंद्रकांत जाधव (वय २४, रा. खांडज, ता. बारामती), मनोज उर्फ बाबू शिवराज गालफाडे (वय १९, रा. बुरूडगल्ली, बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना भिमराव रामचंद्र पिंगळे हे मोटारसायकलवरून घरी जात असताना घडली. दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण केली व रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.
पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या सूचनेनुसार, बारामती परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली गस्त वाढवण्यात आली होती. पिडीत पिंगळे यांच्याकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून, आरोपींची नावे स्पष्ट झाल्याने पोलीस पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर जबरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक साळवे, हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, जयसिंग कचरे, अमोल वाघमारे यांनी सहभाग घेतला.






