संग्रहित फोटो
शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे तूप विक्रीसाठी आल्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून देवघरातील देवीच्या अंगावरील दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोन महिलांना ग्रामस्थांनी सतर्कतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गीता रमेश एकणार आणि दुर्गा संजय भिसे (दोघी रा. कळंब, ता. यवतमाळ) अशी या चोर महिलांची नावे आहेत. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.
जनाबाई उमाप या घरात जेवण करत असताना दोन अनोळखी महिला तूप विक्रीसाठी आल्या. त्यांनी तूप घ्यायचे आहे का, असे विचारत घरात प्रवेश केला आणि “देवाचे दर्शन घेऊ द्या” असे सांगत देवघराजवळ गेल्या. काही क्षणांतच त्या गडबडीत घराबाहेर पडल्या. यानंतर जनाबाई यांनी देवघर तपासले असता देवीच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
जनाबाई यांनी तात्काळ पोलीस पाटील चित्रकला इंगवले यांना माहिती दिली. त्यानंतर महेंद्र उमाप, राहुल क्षीरसागर, महेश मासळकर, मच्छिंद्र उमाप, महेश नवगिरे, अजित पवार या युवकांच्या मदतीने गावात दोघींचा शोध घेण्यात आला. महिलांना संशयास्पद स्थितीत गाठण्यात आले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीस पाटील इंगवले यांनी महिलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले दागिने सापडले. त्यानंतर ग्रामस्थांनी महिलांना रंगेहात पकडून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. जनाबाई दिनकर उमाप (रा. जातेगाव बुद्रुक) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गीता रमेश एकणार (वय ३५) आणि दुर्गा संजय भिसे (वय ३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे करीत आहेत.