सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/अक्षय फाटक : पुणे शहरात वाढत्या स्ट्रीट क्राईमवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक महत्त्वाची योजना आखली आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे ‘गुगल मॅपिंग’ करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात चार हजार रेकॉर्डवरील गुंडांवर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे शहरात गेल्या काही महिन्यांत गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मारहाण, वाहन तोडफोड, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
पोलिस आयुक्तालयाने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण ३७ हजार ४०८ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील चार हजार गुन्हेगार ‘हाय रिस्क’ श्रेणीत टाकण्यात आले असून, त्यांच्यावर एमपीडीए, मकोका, गोळीबार, खून आणि खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांतील सहभागामुळे विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. ही मोहीम गुन्हेगारांना रोखण्यासाठी आणि शहरवासीयांना सुरक्षितता देण्यासाठी एक ठोस पाऊल मानले जात आहे. पोलिसांच्या या ‘डिजिटल स्ट्रॅटेजी’मुळे गुन्हेगारांच्या हालचाली अधिक जवळून तपासता येणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठळक बाबी:
गुन्हेगारांच्या घरांचे ‘गुगल मॅपिंग’ करून त्यांच्या ठिकाणांची अचूक माहिती गोळा.
गुन्हेगारांची दैनंदिन हालचाल टिपण्यावर भर.
गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही योजना राबवली जाणार.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर गुन्हे शाखेचे लक्ष, तर उर्वरित गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांचे लक्ष.