संग्रहित फोटो
सांगली : पुण्यासारख्या महानगरात बांगलादेशातून आलेल्यांची संख्या मोठी असून, वेगवेगळ्या भागात वास्तव करणाऱ्यांना पुणे पोलिसांकडून पकडले जात असताना आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे तेथून घुसखोरी करून कोलकता, पुणेमार्गे थेट सांगलीत येऊन एका लॉजवर राहणाऱ्याला सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली आहे. अमीर शेख असे त्याचे नाव आहे. दिल्लीतील बनावट आधार कार्डच्या आधारे तो लॉजवर राहत असल्याचे तपासात समाेर आले आहे. अमीर शेख हा बांगलादेशातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
शनिवारी मध्यरात्रीनंतर सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. रविवारी सकाळी पथकाला पटेल चौक ते आमराई रस्त्यावर एकजण संशयितरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने अमीर शेख (रा. दिल्ली) असे नाव सांगितले. शेख याने आधार कार्डही दाखवले. आधार कार्डावर एबीसी नजदीक, आंबेडकर चौक, मुनरीका गाव जेएनयू दक्षिण-पश्चिम दिल्ली असा पत्ता दिसला. चौकशीदरम्यान पोलिसांचा संशय वाढला. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा शेख याने तो बांगलादेशातील ढाका येथील असल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेत तपासला. त्यामध्ये बंगालीभाषेचा वापर व ८८० आयएसडी कोड असलेले मोबाईल व लँडलाईन नंबर पोलिसांना आढळून आले. कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही अधिकृत कागदपत्राशिवाय भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने शेख याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
संशयास्पद हालचालींची करणार चौकशी
शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे म्हणाले, बांगलादेशी आमिर शेख हा त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून १३ मार्च रोजी विमानाने कोलकताला आला. तेथून पुण्यात आला. शिवाजीनगर बसस्थानकातून सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील विशाल लॉज येथे राहत होता. बांगलादेशातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे तो घुसखोरी करून भारतात आला. रात्री तो शहरात संशयास्पद का फिरत होता ? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास सुरू आहे, असे सांगितले.
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
भारतात राहण्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना भारतात घुसखोरी करून डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शिताफीने अटक केली आहे. शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याच्या बाजुला कोळेगाव आहे. कोळेगावातील कृष्णा मंदिराच्या मागे अनिल पाटील चाळीत या तीन महिला राहत होत्या. कोळेगावात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ एक पथक स्थापन केले. या महिला कोळेगावात राहतात का, त्या कोणत्या व्यवसाय करतात याची पहिले गुप्त माहिती काढली. या माहितीची खात्री झाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक कोळेगावात दाखल झाले. त्यांनी महिलांना ताब्यात घेतले.