पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास
अक्षय फाटक: गडकिल्ल्यांच्या साक्षीने वाढलेला इतिहास, दऱ्यांच्या निसर्गाने लाभलेलं सौंदर्य व शिक्षण–संस्कृतीची दृढ परंपरा सांभाळणारं पुणे शहर. शांततेचा श्वास घेणारं, विचारांनी समृद्ध असं पुणे… पण या उजळलेल्या चेहऱ्याच्या मागे गेल्या चाळीस वर्षांत एक काळी रेषा हळूहळू गडद होत राहिली. १९८० नंतरचा काळ शहरासाठी वळणबिंदू ठरला. लोकवस्तीचा विस्फोट, जलद शहरीकरण, बांधकामव्यवसायातील भल्या–मोठ्या उलाढाली आणि परिसरातील वाढती आर्थिक स्पर्धा, या सर्वांनी पुण्यात एक अदृश्य पण ताकदवान गुन्हेविश्वाची सावली निर्माण करायला सुरुवात केली. सांस्कृतिक-शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या नकाशावर ही सावली दिवसेंदिवस गडद ठिपके उमटवत आहे. आजच्या घडीला हा विस्फोट भयावह रूप धारण करत आहे. त्यातील काही निवडक टोळ्या आणि टोळी प्रमुखांचा हा इतिहास पाहिल्यानंतर ही रेषा कशी वाढली याचा अंदाज येईल.
पुण्यातील पहिली टोळी म्हणून आंदेकर टोळीची नोंद आहे. आंदेकर कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे. पिढीजात व्यावसायासाठी हे कुटूंब नाना पेठेत स्थायिक झाले. बाळकृष्ण उर्फ बाळू व्यंकटेश आंदेकर हा कुटूंबातील पैलवान. त्याचा मित्र प्रमोद माळवदकर. दोघेही कट्टर मित्र. व्यवसायासाठी आलेले आंदेकर कुटूंब बाळू आंदेकर याच्या रूपाने गुन्हेगारीकडे वळले. १९७० च्या दशकात बाळू आंदेकरची टोळी सक्रिय झाली. प्रमोद त्याच्या टोळीचा एक भाग. तेव्हा आप्पा तारू व आंदेकर टोळीत वाद सुरू झाला.
Delhi Crime: इंस्टाग्रामवर ओळख, ब्लॅकमेल, धमक्या आणि लैंगिक
बाळू आंदेकर टोळीने तारू टोळीचा मास्टर माईंड बाळू कांबळेचा खून केला आणि खऱ्या अर्थाने आंदेकर टोळीची दहशत निर्माण झाली. नंतर मात्र, प्रमोद माळवदकरच्या वडिलांना बाळू आंदेकरने शिवाजी मार्केट चौकात मारहाण केली. ही गोष्टी प्रमोद याच्या जिव्हारी लागली. १९८४ साली कोर्टातच बाळू आंदेकरचा प्रमोद माळवदकरने खून केला. नंतर माळवदकर गँग उदयास आली. बाळू आंदेकरनंतर बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याने टोळीची सूत्रे हाती घेतली. बाळू आंदेकरच्या खूनाचा बदला म्हणून प्रमोद माळवदकर टोळीतील ६ जणांचा खून केला. साधारण दोन टोळ्यात १० वर्ष टोळी युद्ध चालले.
१९८५ मधील एका खूनात बंडू आंदेकरला १० वर्षांची शिक्षा झाली. बंडू आंदेकर याला उदयकांत, रमाकांत व श्रीकांत हे तीन भाऊ होते. उदयकांत १९९२ मध्ये उदयकांतच्या रूपाने या टोळीने राजकारणात प्रवेश केला. उदयकांत पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आला. १९९६ मध्ये आंदेकर कुटूंबातील चार नगरसेवक झाले. नंतर बंडू आंदेकर याच्या चुलत बहिण वत्सला आंदेकर या महापौर झाल्या. उदयकांत आदेकर याच्यावरही खूनाचा प्रयत्न, मारामारीचे १३ गुन्हे नोंद होते, असे पोलिस दप्तरी नोंद आहे.
माळवदकर व आंदेकर टोळीच्या युद्धाचा पुर्ण विराम होत नव्हता. पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच १९९७ मध्ये प्रमोद माळवदकरचा काळेवाडी परिसरात पोलिस चकमकीत एनकाऊंटर झाला. नंतर आंदेकर टोळीचे मोठे प्रस्थ वाढले आणि माळवदकर व आंदेकर टोळीच्या युद्धाला पुर्णविराम देखील लागला.
बंडू आंदेकर याला शिक्षा लागल्यानंतर काही काळ कृष्णा आंदेकर बाहेर राहून टोळी चालवू लागला. पण, तेव्हाही बंडू आंदेकर याचे मार्गदर्शन सुरू होते, असे पोलिसांचे निरीक्षण आहे. असंख्य गुन्हे नोंद झाल्यानंतर कृष्णा आंदेकर व वनराज आंदेकरला २००९ मध्ये पुणे पोलिसांनी तडीपार केले, अशी नोंद पोलिस दप्तरी आहे. नंतर बंडू आंदेकर जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याने टोळीचे सूत्रे हाती घेतली. २०१६ पासून वेगवेगळ्या टोळ्यांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला.
Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?
आंदेकर टोळी व नव्याने उदयास आलेल्या सुरज ठोंबरे टोळीत संघर्षाला सुरूवात झाली. त्यांच्या सतत वाद होत होते. त्यात आंदेकर टोळीतीलच सोमनाथ गायकवाड याचे आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद झाले आणि तो वेगळा झाला. त्याचे नाना पेठेत प्रस्थ वाढू लागले. आंदेकर टोळीचा रामजी गुज्जर याला मारहाण केली. त्यातून वाद विकोपाला गेला. नंतर सुरज ठोंबरे व सोमनाथ गायकवाड हे एकत्र आले. त्यांनी आंदेकर टोळी हस्तक आदित्य उकिरडे याच्या खूनाचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात दोघांनाही मोक्कानुसार कारवाई झाली. नंतर आदित्यच्या मारहाणीचा बदला म्हणून कृष्णा आंदेकर व टोळीने कोंढव्यात विघ्नेश गोरे याच्यावर गोळीबार केला.
सोमनाथ गायकवाड आणि सुरज ठोंबरे हे कारागृहात होते. तेव्हा सोमनाथचा नातेवाईक व मित्र अनिकेत दुधभाते व निखील आखाडे हे नाना पेठेत सोमनाथच्या पत्नीला पैसे देण्यास आल्यानंतर २०२३ मध्ये आंदेकर टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. यात निखिल आखाडेचा खून झाला.
निखील आखाडे व अनिकेत हे आंबेगाव पठारावरची मुल. नव्याने निर्माण झालेल्या यश साहोता या रायझिंग गँगचे सक्रिय सदस्य. निखीलच्या खूनाचा बदला घ्यायचा हे रायझिंग गँगने ठरवले होते. त्यांनी सोमनाथ जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याच्याशी हात मिळवणी केली आणि वर्षाच्या आत बदला पुर्ण करायचे ठरवले. सोमनाथला देखील नाना पेठेत राहणे धोकायदायक होते. त्यामुळे तोही आंबेगाव पठार याठिकाणी राहण्यास गेला. त्यात बंडू आंदेकराची मुलगी संजिवणी हिचे आंदेकर कुटूंबाशी आर्थिक वाद सुरू होते. जावई जयंत कोमकर याच्या दुकानावर अतिक्रमण कारवाई झाली होती. ती कारवाई वनराज याने करायला लावल्याचा समज कोमकर यांच्यात होता. त्यांनी सोमनाथ गायकवाड टोळीशी हात मिळवणी केली. २०२४ मध्ये बंडू आंदेकरकरचा मुलगा वनराज याचा निखीलच्या खूनाचा बदला म्हणून गोळ्या झाडून व कोयत्याने वारकरून खून केला.
वनराज आंदेकर याचा खून बंडू आंदेकर याच्या जिव्हारी लागला होता. तेव्हाच त्याने रक्तरंजित खेळ काय असतो हे दाखवेल अशी भाषा केली होती. काहींनी वनराजच्या खूनाचा बदला वर्षात घेतला जाईल अशी शप्पथ देखील घेतली होती. यातूनच नातवाचा म्हणजेच संजिवणीचा मुलगा आयुष कोमकरचा ९ गोळ्या झाडून खून झाला. नंतर कोंढव्यात गणेश काळे याचा देखील गोळ्या झाडून व कोयत्याने वारकरून खून झाला.
आंदेकर टोळीचे प्रस्थ हे नाना पेठ, भवानी पेठ व रविवार पेठेत आहे. आंदेकर टोळीत जवळपास ८२ सदस्य आहेत. त्यातील १६ जण मयत झाले असून, १८ जण कारागृहात आहेत. तर उर्वरित बाहेर आहेत. आंदेकर टोळीच्या प्रमुख विरोधी टोळीत सोमनाथ गायकवाड, सुरज ठोंबरे आणि सोहोता गँग आहेत. त्यांच्यात सातत्याने टोळी युद्ध भडकलेत राहिले आहे. हे टोळी युद्ध आता पुर्णविराम न घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. आजही आंदेकर टोळी चा कणा बंडू आंदेकर आहे.
(हा लेख ‘ दैनिक नवराष्ट्र’चे वरिष्ठ संपादक अक्षय फाटक यांनी संपादित केला आहे. )
Mail-ID akshayphatak789@gmail.com
twitter id- @phatak789 (Akshay Phatak)
Ans: पुण्यातील पहिली टोळी म्हणून आंदेकर टोळीची नोंद आहे. १९७० च्या दशकात ही टोळी सक्रिय झाली
Ans: टोळीचा पहिला प्रमुख बाळकृष्ण उर्फ बाळू व्यंकटेश आंदेकर हा एक पैलवान आणि ताकदवान व्यक्ती म्हणून ओळखला जात असे.
Ans: त्याच्या नंतर नेतृत्व बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी घेतले. त्याच्या नेतृत्वात टोळी सक्रिय राहिली.






