Photo Credit- Social Media नागपूरमध्ये पत्रकारास देशविरोधी कारवायांप्रकरणी अटक
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोतील पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करुन पसार झालेल्या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला नरवीर तानाजीवाडी परिसरातून पकडण्यात आले आहे.
विशाल ईश्वर वाळके (वय ४०, रा. सुयोगनगर, नवेगाव, गडचिरोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६४, रा़ कल्पना विहार, सुयोगनगर, नवेगाव, जि.गडचिरोली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत उपनिरीक्षक मोहन काशीनाथ सोनकुसरे (वय ५७, रा. इंदिरानगर, लांझेडा,जि. गडचिरोली) यांच्या तक्रारीनुसार गडचिरोली पोलिसांत गुन्हा नोंद आहे. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन सोनकुसरे हे गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांची मोठी बहीण कल्पना उंदिरवाडे या गडचिरोली जिल्हा परिषदेत कक्ष अधिकारी होत्या. त्या २०१८ मध्ये निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले होते. कल्पना या मुलगा उत्कल (वय २५) याच्यासोबत त्या राहत होत्या. १३ एप्रिल रोजी कल्पना यांचे भाऊ उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे गडचिरोली पोलीस मुख्यालयात निघाले होते. त्यावेळी त्या बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले.
त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे यांचा भाचा उत्कल परीक्षेसाठी गेला होता. गडचिरोली पोलिसांनी तपास सुरू केला. कल्पना यांच्याकडे भाडेकरु असलेल्या आरोपी विशाल वाळकेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला पुन्हा बोलाविले. विशाल चौकशीला उपस्थित न राहता पसार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा घटनेच्या आदल्या दिवशी तो कल्पना यांच्या घरी आला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी होता. त्याने कल्पना यांच्या मोबाइल वरुन काही व्यवहार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. पण, मिळाला नाही. दरम्यान, विशाल पुण्यात असल्याचे समजले. नंतर शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने त्याला नरवीर तानाजीवाडी परिसरातून ताब्यात घेतले.