संग्रहित फोटो
पुणे : नशेसाठी खाण्यात येणाऱ्या तसेच छुप्या पद्धतीने पण सहजरित्या बाजारात उपलब्ध होणारी भांगयुक्त ‘बंटा’ गोळी विकणार्या एकाला गुन्हे शाखेने पकडले आहे. त्याला शिवणे भागातून अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ४ किलो ८० ग्रॅम वजनाचे २४ मोठे पॅकेज जप्त केले आहे. गोळीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. अनेक विद्यार्थी व अल्पवयीन मुले या बंटा गोळीच्या आहारी गेल्याचे वास्तव आहे. काही दिवसांपुर्वी मुंढव्यात एका अल्पवयीनाने बंटा गोळी खाल्यानंतर नशेत चार ते पाच वाहनांची तोडफोड केली होती.
दिनेश मोहनलाल चौधरी (३०, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चौधरी हा मूळचा राजस्थानचा असून मागील पाच वर्षांपासून शिवणे भागात किराणा दूकान चालवितो. दरम्यान, नशेची सवय लागलेल्या तरूणांमध्ये भांगयुक्त असलेली ही गोळी ‘बंटा’ नावाने ओळखली जाते. बंटा कोडवर्ड वापरून शहरातील अनेक टपर्यांवर छुप्या पद्धतीने ही गोळी विकली जाते. सामान्य नागरिकांना ती सहजासहजी उपलब्ध होत नाही. मात्र, नशेखोर आणि कोडवर्डचा वापर करणार्यांना ती दिली जाते.
विशेष म्हणजे अगदी दहा ते पंधरा रूपयांना एक गोळी विकली जाते. परिणामी अनेकजण बंटा गोळीच्या आहारी गेले आहेत. गोळीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होत नसल्याने पोलिस यंत्रणेपुढेही आव्हान निर्माण झाले आहे. पाणी अथवा सोडा यामध्ये मिसळून ही गोळी खालली जाते. नंतर काही तास त्याचा परिणाम दिसून येतो. झोप लागते. व्हाईटनर, दारू यापेक्षा भांगयुक्त बंटा गोळी खाल्ल्यानंतर अधिक डेअरिंग येते, असा समज युवकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे भांगेची बंटा गोळी सध्या शहरात तेजीत असल्याचे वास्तव आहे.
देशमुखवाडी, शिवणे भागात एकाकडे बंटा गोळ्या असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानूसार सहायक निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांच्या पथकाने चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या सुमारे १० हजार ८०० रुपयांचे बंटा गोळ्यांचे पॅकेट जप्त करण्यात आले आहेत.
आयुर्वेदीकच्या नावाखाली विक्री
शिवणेत अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी बंटा गोळ्या असलेली पाकिटे जप्त केली. त्यावर विजयावटी आयुर्वेदीक औषधी असे लिहीलेले आढळले. त्यामुळे आयुर्वेदीकच्या नावाखाली विक्रेत्यांकडून अशा भांगयुक्त गोळ्यांची विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांकडून अशा विक्रेत्यांचा शोध सुरू आहे.