पुण्यात चूहा गँग’वर कारवाई (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र )
पुणे: दहशत माजविणार्या तसेच ड्रग्जमधून पैसा कमवत त्यातून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या कात्रजमधील चूहा गँगवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. आंबेगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून, टोळीचा म्होरक्या तौसिफ उर्फ जमीर सय्यद उर्फ चूहा याच्यासह चौघांचा यात समावेश आहे. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आरोपींनी अंमली पदार्थांची खरेदी विक्री, खूनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी सारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
टोळीप्रमुख तौसिफ जमीर सय्यद उर्फ चूहा (२८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (३५), मार्कस डेव्हीड इसार (२९), कुणाल कमलेश जाधव (२५) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख तौसीफ उर्फ चूहा याने त्याच्या अन्य साथीदारांसह स्वतःच्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली. या टोळीची कात्रज तसेच आंबेगाव भागात दहशत होती. त्यांनी अनेक गंभीर गुन्हे केले.
आरोपी तरूण मुलांना व्यवसनाधीन करून त्यांना गुन्हेगारी टोळीत सामील करत होते. त्यानुसार, गुन्हेगारी संघटना वाढविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांच्या वर्तणूकीत सुधारणा होत नसल्याने आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झीने यांनी तयार केला. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविला होता. पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त राहूल आवारे पुढील तपास करीत आहेत.
कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
पुणे स्टेशन परिसरात हॉटेल कामगाराला भोसकून त्याच्याकडील रोकड लुटण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गौरव भारत धोकडे (वय १९), आकाश बाळू कांबळे (वय १९, दोघे रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आत्माराम धर्मा आडे (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा, मूळ रा. आर्णे, जि. यवतमाळ) जखमी झाले आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: पुण्यात गुन्हेगारी वाढली! कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
आडे क्वीन्स गार्डनमधील एका क्लबच्या आवारातील हॉटेलमध्ये वेटर आहे. सोमवारी मध्यरात्री काम संपवून ते घरी निघाले होते. स्टेशन परिसरातील अलंकार टॉकीजजवळ ते रिक्षाची वाट पाहत थांबले होते. तेव्हा आरोपी धोकडे आणि कांबळे दुचाकीवरुन आले. त्यांनी आडे यांच्याकडे ५०० रुपये मागितले. आडे यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयता काढून पोटाला लावला. कोयत्याने भोसकून आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील आडे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तपास करुन पसार झालेल्या आरोपींना पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.