संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : “खून का बदला खून से”…! गुन्हेगारी जगतातील हा डाव सोमवारी (१ सप्टेंबर) उधळला गेला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी आखली होती. मध्यरात्री गेम वाजविण्याचा कट रविवारी रचला गेला होता. मात्र, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वॉच ठेवणाऱ्याला रंगेहात पकडताच संपूर्ण प्लॅनच उधळून लावला. त्यामुळे रक्ताच्या बदल्यात रक्त घेण्याचा डाव थांबला असला, तरी सुत्रधार अजूनही बेपत्ता असल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर गट व सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर मागील काही वर्षांपासून पेटलेलं आहे. २०२३ मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते व निखील आखाडेवर हल्ला केला होता. त्यात निखीलचा मृत्यू झाला; तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी पेटली होती. २०२४ च्या १ सप्टेंबर रोजी, बंडू आंदेकर यांच्या वर्मी घाव घालण्याच्या उद्देशाने निष्पाप माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा डोके तालीम भागात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या हत्येने पुण्यात धुमाकूळ उडवला होता.
वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा “गेम” उडणार अशी हवा गुन्हेगारी वर्तुळात होती. टोळकं सज्ज होतं, शस्त्रं देखील आणली गेली होती. पण पोलिसांच्या अचूक वॉचमुळे मध्यरात्रीचा कट फसला. टोळीचे गेम वाजवणारे बेपत्ता झाले असून मोबाईल बंद करून ते अज्ञात वासात गायब झाले आहेत.
कट उधळला, सुत्रधार अजूनही गायब!
वनराज आंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडसह २३ जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. ते तुरुंगात असले, तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेला होता. पोलिसांनी एकाला पकडून कट मोडीत काढला असला तरी, “नेमका गेम कोणाचा वाजणार होता?” हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
खूनाच्या घटनेला वर्ष पुर्ण
वनराज आंदेकर यांचा (दि. १ सप्टेंबर २०२४) पुण्याच्या मध्यभागातील डोके तालीम परिसरात अचानक हल्ला करून खून केला होता. गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. सोमवारी (दि. १ सप्टेंबर २०२५) या घटनेला वर्ष पुर्ण झाले. त्याचदिवशी बदला म्हणून हे फ्लॅनिंग केले होते. मात्र, पोलिसांपर्यंत खबर गेल्याने मोठा कट उधळला गेला.