सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : शांतताप्रिय शहरात गुन्हेगारांकडून दहशतीसाठी वाहनांचे खळखट्याक करण्याचा प्रकार सुरूच असून, वारजे, येरवडा, पर्वतीनंतर आता बिबवेवाडीत तिघांनी रात्रीत ७० वाहने फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक-एक वाहनांच्या काचा फोडत तिघांनी नंगा नाच घातला. माधव वाघाटेच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आदल्या दिवशी गोळीबार अन् गुंडाचा फिल्मी स्टाईल पाठलाग लागलीच रात्री वाहनांचे खळखट्याकमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. तर सर्व सामान्य नागरिक भयभित आहेत. सलग घटनांमुळे पुन्हा ‘बिबवेवाडी’ अशांत झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकत त्यांची त्याच भागात धींड काढली.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर यांना अटक केली आहे. आरोपी निरंजन देवकरला वेल्ला येथून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, पोलीस शिपाई पवन भोसले यांनी ही कारवाई केली आहे. तर, अभिषेक व ठाकरला बिबवेवाडी पोलिसांचे उपनिरीक्षक अशोक येवले व त्यांच्या पथकाने पकडले.
शहरात गुन्हेगारांकडून दहशतीसाठी वाहन तोडफोड सत्र कायम असल्याचे बिबवेवाडीतील घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलीस धींड काढण्यासोबतच कठोर कायदेशीर कारवाई करत असतानाही गुन्हेगार मात्र, त्याला धजावत नसल्याचे दिसत आहे. वारजे, पर्वती, येरवडा, सहकारनगर, विमानतळ या भागात नुकत्याच वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. नंतर या गुंडाची पोलिसांनी ‘भाईगिरीची हवा’ देखील काढली होती. नंतर हे प्रकार थांबतील असे वाटत होते, पण बिबवेवाडीत मात्र, गाड्या तोडफोडीचा कहर झाला.
महिन्याभरापूर्वी झालेल्या मारहाणीतून निरंजन, अभिषेक व ठाकर यांनी मध्यरात्री तुफान राडा घातला. तिघांनी रस्त्यावर पार्क केलेल्या सर्व सामान्य नागरिकांची वाहनांची अंधा-धुंद तोडफोड केली. कार, टेम्पो, तीन चाकी रिक्षा तसेच दुचाकींचा यात समावेश आहे. अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात ही तोडफोड केली गेली. वाहन तोडफोडीचा आवाज तसेच तिघांचा आवाज ऐकल्याने नागरिकांनी आरडाओरडा केला. तेव्हा तिघांनी तेथून काढता पाय घेतला. नंतर बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
रात्रीचे भाई, सकाळी गुडघ्यावर..!
अप्पर इंदिरानगरचा परिसर अशांत करणाऱ्या निरंजन, अभिषेक आणि ठाकर यांनी रात्री भाईगिरीचा जोर आणत प्रचंड दहशत निर्माण केली. परंतु, हेच भाई पोलिसांनी रात्रीत पकडले. त्यानंतर त्यांना प्रसाद देऊन भल्या सकाळीच त्याच भागात नेहून त्यांना गुडघ्यावर आणले. त्यांची धींड काढून दहशत कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु, पोलीस असे करत असले तरी गुन्हेगार मात्र, तोडफोड करून पुन्हा दहशत माजवत आहेत.