सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : काही दिवसांपूर्वी (१७-१८ सप्टेंबर) मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ टोळीने पुण्यात धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले होते. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात पहिल्यांदा ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून गुंड निलेश घायवळचा शोध सुरु आहे. घायवळबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ हा स्विर्त्झलंडमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान तो लंडनमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कोथरूड भागातील गँगस्टर निलेश घायवळसह त्याच्या टोळीवर कोथरूड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. त्यापूर्वी निलेश व टोळीवर खुन, दरोडा, मारामारी, खंडणी सारखे गुन्हे दाखल आहेत गेल्या आठवड्यात टोळीतील सराईत गुन्हेगारांनी तरूणावर गोळीबार करून लगेच १० मिनिटात दुसर्या तरूणावर धारदार हत्याराने वार केले होते. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी निलेश घायवळसह टोळीवर मोक्का कारवाई केली.
दरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगाने निलेश घायवळची माहिती घेतल्यानंतर तो पुण्यात व अहिल्यानगर परिसरात नसल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात त्याची माहिती घेतल्यानंतर त्याचे लोकशन सध्या स्वित्झर्लंड येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पण, त्यापूर्वी तो लंडनमध्ये असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान घायवळला देण्यात आलेला पासपोर्टबद्दलही पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान त्याला पासपोर्ट आहिल्यानगर येथील आयुक्तालयातून देण्यात आला आहे. त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हीसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला असा प्रश्नही या निमित्ताने होत असून, पुणे पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे. त्याने, पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळवला त्या दृष्टीनेही पुणे पोलिस चौकशी करत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : 18 कोटी रुपये, कोथरूडमध्ये फ्लॅट अन्…; आंदेकर कुटुंबाचे आणखी काळे कारनामे समोर