संग्रहित फोटो
पुणे : टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खूनप्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरूवात केली आहे. धक्कादायक म्हणजे, आंदेकरांच्या घराच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आल्याचे समोर आले आहे. परिसरात कोण-कोण येत आणि जात याची माहिती होण्यासाठी हे जाळे तयार करण्यात आल्याचे उघड झाले असून, त्याचे कंट्रोलरूम देखील आंदेकरांच्या घरात होती. दरम्यान, बंडू आंदेकर व कुटूंबाची १८ कोटींची मालमत्ता निष्पन्न केली आहे. तसेच, आणखी मालमत्तेबाबतची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.
आंदेकर-गायकवाड टोळीच्या युद्धातून आंदेकर टोळीने ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर या १९ वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून केला. खूनानंतर पोलिसांनी बंडू आदेकरसह १६ जणांना अटक केली. आता पोलिसांनी बंडू आदेकर व त्याच्या टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या घरी छापा कारवाई करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान, दोन पिस्तूल, ४ कार, ४ दुचाकी तसेच २८ मोबाईल, सोन्याचे दागिने, रोकड असा ९५ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता. आंदेकर व कुटूंबातील ३७ बँक खाती गोठवून त्यातील १ कोटी ४७ लाखांची रोकड गोठवली आहे. यादरम्यान, वेगवेगळे तीन गुन्हे आंदेकर टोळीशी संबंधित दाखल झाले आहेत.
घर व परिसरात सीसीटीव्हीचे जाळे
बंडू आंदेकर तसेच मुलगी वृंदावणी वाडेकर हिच्या घराच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले होते, या भागात कोण येत आणि जात याची पाहणी यामाध्यमातून केली जात होती. त्याची कंट्रोल रूम देखील आंदेकरच्या घरात केली होती. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली. त्यामध्ये आंदेकर टोळीचा विश्वासू मोहन गाडेकर याने सीसीटीव्हीचे फुटेज डिलीट केल्याचे समोर आले आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
१८ कोटींची मालमत्ता निष्पन्न
आंदेकर टोळीची मालमत्ता तपासणीचे काम पोलिसांनी सुरू केले असून, त्यामध्ये आतापर्यंत १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्त निष्पन्न झाली आहे. बंडू आंदेकरची फुरसूंगीत २४.५ गुठे जागा, कोथरूडमध्ये फ्लॅट, दोन दुकाने, तीन मजली घर, नाना पेठेत फ्लॅट, लोहियानगरमध्ये दोन खोल्या, हडपसरमध्ये एक खोली तसेच वृंदावणी वाडेकर हिच्याकडे तीन मजली राहते घर, एक टपरी, साईनाथ झोपडपट्टी हडपसर येथे खोली तसेच शिवम आंदेकर याच्या नावे मुळशीतील अगळांबे गाव येथे २२ गुंठे जागा, कोथरूड व नाना पेठेत फ्लॅट व दुकान, तर शिवराज आंदेकर याचे नाना पेठेत फ्लॅट व सोनाली आंदेकर हिच्याकडे नाना पेठेत दोन दुकाने अशी मालमत्ता निष्पन्न झाली आहे. त्यासोबतच १६ विकसन करारनामे देखील समोर आले असून, नातेवाईक व हितसंबधिंतांच्या नावे असलेल्या मालमत्तेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.