सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : खडकी बाजार परिसरात ज्येष्ठाच्या हातातील दहा लाखांची रोकड चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या वाहनावरील चालकानेच ही रोकड मित्राच्या मदतीने चोरल्याचे समोर आले आहे. चाकणहून ज्येष्ठ नागरिक खडकीत एका व्यावसायिकाला देण्यासाठी रोकड घेऊन आले होते. तेव्हा भर दिवसा सर्वांदेखत ही रोकड चोरीचा थरार घडला होता.
चेतन मंगेश गोडसे (वय २८) आणि आकाश कैलास माळी (वय २५, दोघे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमीर युसुफ सय्यद (वय ६६, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी खडकी पोलिसांत तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस अंमलदार संदेश निकाळजे, आशिष पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.
चाकण येथील सुशील गोयल यांच्याकडे अमीर सय्यद कामाला आहेत. ते खडकीतील एकाला देण्यासाठी १० लाखांची रोकड घेऊन आले होते. खडकी बाजार येथील श्री महालक्ष्मी ज्वेलर्स समोर ते दुपारी पावणे दोनच्या सुमारास पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हातातील १० लाख रुपये असलेली बॅग हिसका मारुन चोरुन नेली. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. तसेच त्यांच्या व्हेस्पा स्कुटरला नंबर प्लेट नव्हती. घटनेची माहिती मिळताच अप्पर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती.
पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याद्वारे आरोपींचा माग काढून चाकण येथून ६ तासांच्या आत पकडले. त्यांनी चोरलेले १० लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह त्यांना अटक केली आहे. आकाश माळी हा गोयल यांच्याकडे वाहनचालक म्हणून कामाला आहे. त्याला माहिती होते की, अमीर सय्यद याच्याकडे खडकी बाजार येथे देण्यासाठी १० लाख रुपये दिले आहेत. त्याने मित्राच्या मदतीने हा कट रचून तडीस नेला होता. पण पोलिसांनी दोघांनाही काही तासात अटक केली.