नाल्यात सापडला १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह(फोटो सौजन्य-X)
ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे श्यामसुंदरपूर गावातील नाल्यातून १० वर्षांच्या मुलीचा नग्न मृतदेह आढळला आहे. मुलीच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत. ज्यामुळे तिच्यावर बलात्कार करून नंतर हत्या करण्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संताप पसरला आहे आणि गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी रस्ता रोखला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचवीत शिकणारी ही १० वर्षांची मुलगी शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी रात्रभर तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही तेव्हा त्यांनी अंगुल सदर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. आज सकाळी गावातील एका नाल्यात मुलीचा नग्न मृतदेह आढळला, त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
मृत मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिच्या शरीरावर मानेजवळ, कानांवर आणि डोळ्यांजवळ खोल जखमांच्या खुणा आहेत. कान काढलेगेले आहेत आणि डोळे बाहेर काढले आहेत असे वाटत होते. हे खुणा पाहून त्यांना संशय आला की मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घृणास्पद गुन्ह्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तात्काळ शबलभंगाकडे जाणारा रस्ता रोखला, ज्यामुळे अंगुल आणि बंटाला दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच अंगुलचे एसपी राहुल जैन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत एक वैज्ञानिक पथक आणि श्वान पथकही उपस्थित आहे, जे घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ‘अनैसर्गिक मृत्यू’ (प्रकरण क्रमांक- १४/२०२५) नोंदवून तपास सुरू केला आहे.
अंगुलचे एसपी राहुल जैन म्हणाले, “मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात युडी केस, केस क्रमांक १४/२०२५ दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी वैज्ञानिक पथक, श्वान पथक आणि पोलिस पथक उपस्थित आहे. मुलगी काल संध्याकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल.” पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.