सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण : गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणुका सुरू असताना चाकण परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाकी बुद्रुक – भामा नदीत दोन युवक बुडाले
वाकी बुद्रुक येथील प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीत अभिषेक संजय भाकरे (२१, रा. कोयाळी, ता. खेड) व आनंद जयस्वाल (२८, रा. उत्तरप्रदेश) हे दोघे विसर्जनासाठी उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलवर गेल्याने ते बुडाले. यामध्ये आनंद जयस्वाल याचा मृतदेह सापडला, तर अभिषेक भाकरे याचा शोध अजूनही सुरू आहे. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे रवींद्र वासुदेव चौधरी (४५) हे नदीत विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह शोध पथकांना सापडला असून, त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिरदवडी – विहिरीत पडून मृत्यू
बिरदवडी (ता. खेड) येथील संदेश पोपट निकम (३५) हे गणेश विसर्जनासाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले व बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दल व रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
बचावकार्य, रेस्क्यू टीमची मदत
या सर्व घटनास्थळी तात्काळ चाकण पोलीस, एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल तसेच स्थानिक रेस्क्यू टीम दाखल झाली. पाण्यातील शोधमोहीमेसाठी नदीकाठ व विहिरीभोवती पथके तैनात आहेत. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता युवकाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन धाब्यावर बसले
गणेश विसर्जनादरम्यान “नदीत, विहिरीत किंवा खोल पाण्यात न उतरता कृत्रिम तलावांचा वापर करावा” असे आवाहन चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून वारंवार करण्यात आले होते. तरीही काही भक्तांकडून हे आवाहन दुर्लक्षित करून थेट नदीपात्रात प्रवेश केला गेला. निष्काळजीपणामुळे तीन जणांचे प्राण गेले असून, एक अजूनही बेपत्ता आहे.