संग्रहित फोटो
कोल्हापूर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता उदगाव येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर हॉटेल समृद्धीमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा चाकूने सपासप करून खून केल्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली आहे. विपुल प्रमोद चौगुले (वय २० राहणार जैन बस्तीजवळ, उदगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. या खून प्रकरणी संशयित अनिकेत मोरे व नागेश जाधव दोघे (रा. बेघर वहसात, उदगाव) यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे. अनिकेत मोरे व नागेश जाधव यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू हस्तगत केला आहे.
विपुल हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याचा व संशयित आरोपी यांच्यात पूर्वीचा वाद होता. यातूनच त्याचा खून झाल्याची चर्चा आहे. घटनास्थळी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळुंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. चौगुले याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित केले. यानंतर जयसिंगपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आहे.
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.