संग्रहित फोटो
पिंपरी : भाजीविक्रेत्या महिला व्यावसायिकाचे घर फोडून १४ तोळे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. तब्बल चार महिने पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपींना मुंबई आणि बेंगळुरू येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने बिहार येथून जप्त करण्यात आले आहेत.
मौजे महाळुंगे इंगळे (ता. खेड, जि. पुणे) येथे राहणाऱ्या कविता मदन कड या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुकान गाळा बंद करून यात्रेनिमित्त आपल्या मूळ गावी गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून कपाटात ठेवलेले १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली कारवाई
स्थानिक सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना सुरुवातीला कोणताही ठोस सुगावा लागला नाही. मात्र, पोलीस अंमलदार संतोष काळे आणि शुभम खंडागळे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुख्य आरोपी निकू सिंग हा सर्व सोने घेऊन बिहारला पळून गेला होता व पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी बिहार, मुंबई आणि कर्नाटकमध्ये लपून राहत होता. सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे आणि त्यांच्या पथकाने सलग चार महिने तांत्रिक विश्लेषण व पाठपुरावा करून रंजन सिंग याला मुंबईतून आणि मुख्य आरोपी निकू सिंग याला बेंगळुरूमधून ताब्यात घेतले. आरोपींनी दागिने मूळ गावी लपविल्याचे सांगताच, पोलीस पथकाने बिहारमधील सीतामढी येथे जाऊन सर्व मुद्देमाल हस्तगत केला.
निक्कुकुमार देवकी सिंग (वय २२, रा. सीतामढी, बिहार), रंजनकुमार देवकी सिंग (वय २०, रा. सीतामढी, बिहार), राजकुमार उर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (वय १९, रा. रोहतास, बिहार), डिंपल पटेल विनोद सिंग (वय २६, रा. केमल भबुआ, बिहार) या चौघाना अटक केली आहे.
यांच्या पथकाची यशस्वी कामगिरी
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, मंगेश कदम, हरी रणदिवे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर, समीर महात आणि तुकाराम घुगे यांच्या पथकाने केली आहे.






