संग्रहित फोटो
राहुरी : अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मंचर (जि. पुणे) येथे करून दूध भेसळीतील मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. कृत्रिम दूध निर्मितीच्या संशयातून २६ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचले असून तिघांना ताब्यात घेतले आहे. मंचरच्या कारवाईत पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव आदी ठिकाणचे आरोपी समोर आले आहेत. या २६ आरोपींपैकी राहुरी तालुक्यातील तीन आणि नगर तालुक्यातील वाळकी येथील एक असे चौघे अहिल्यानगरचे आहेत.
राहुरी तालुक्यातील टाकळीमियों, मोरवाडी येथील प्रमोद घोरपडे, सोनगाव सात्रळ येथील प्रकाश कडू, अजित कारंडे आणि नगर तालुक्यातील वाळकी येथील शुभम गिरवले यांचा समावेश यात आहे. दिनांक ४ जुलैला दुपारी मंचरच्या नवकार डिस्ट्रीब्यूटर येथे छापा टाकण्यात आला. सुशांत हिंगे यांच्या गोदाम व गाडीत दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पावडर व रसायने आढळली. हिंगे यांनी आपण वेगवेगळ्या पावडर आणि व्हेजिटेबल ऑइल, डिटर्जंट, रासायनिक द्रव्ये यांचा फॉर्म्युला तयार करून तो दूध संकलन केंद्र व इतर लोकांना पोचवत असल्याची कबुली दिली.
आरोपी सुशांत टेके (रा. अकलूज) हा पावडर पुरवठादार आहे. भिवंडीचा संजोग यादव केमिकल पुरवठादार होता. अनेक जिल्ह्यात ही साखळी कार्यरत होती. त्यानुसार ५ जुलैला राहुरी तालुक्यात विविध ठिकाणी मंचर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या साथीने छापे टाकले. यावेळी वेगवेगळे साहित्य जप्त केले. एवढेच नव्हे तर आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे देखील तपासल्याचे समजले. यात मोबाईल, सीसीटीव्ही, वाहतूक व्यवस्था यातूनच सहआरोपी निष्पन्न करण्यावर भर आहे.
आरोग्यास धोका निर्माण केला
आरोपींनी संगनमताने विषारी रासायनिक पदार्थ वापरून आरोग्यास घातक बनावट दूध तयार करून व त्याची विक्री करून जनतेची फसवणूक केली. त्यांच्या जीवितात व आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.






