नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
नवी मुंबईच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार इंदिरा नगर परिसरात भंगाराचे दुकान चालवतात. दुकान सुरळीत चालवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपींकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र व्यापाऱ्याने ही मागणी फेटाळून लावत पैसे देण्यास नकार दिला.
तक्रारीनुसार, त्यानंतर पूजा बनसोडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह संबंधित दुकानात प्रवेश केला. यावेळी व्यापाऱ्याला तसेच दुकानातील कामगाराला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
घटनेनंतर पीडित व्यापाऱ्याने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. त्यानंतर मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक करण्यात आली.
या गुन्ह्यात रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांचाही सहभाग असल्याचा आरोप असून हे चौघे सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.
सत्ताधारी पक्षाशी संबंधित महिला पदाधिकाऱ्याला अशा गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्याने या प्रकरणाची राजकीय पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पोलिसांनी हा तपास पुरावे आणि तक्रारीच्या आधारे सुरू असल्याचे स्पष्ट केले असून पुढील चौकशीनंतरच प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.






