सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पोलीसांकडूनही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत गाडीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये कपडे फाटेपर्यंत फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतून दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाने समोरून रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला हॉर्न दिला. या हॉर्नचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने दुचाकीस्वाराशी वाद घातला. यानंतर दोन गटात कपडे फाटेपर्यंत फ्री-स्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला
अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणास नग्न करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सौरभ भरमा कांबळे (वय २४, रा. निढोरी, ता. कागल) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.