संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे बंद घरे फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारत आहे. पुण्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. अशातच आता ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे कॉलनीतील घरातून चोरट्यांनी ३ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत ४३ वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे कॉलनीत राहतात. त्यांनी घरासमोरील पादत्राणे ठेवण्याच्या लोखंडी जाळीत घराची चावी ठेवली होती. चोरट्यांनी लोखंडी जाळीत ठेवलेली चावी घेऊन घराचे कुलूप उघडले. चोरट्यांनी कपाट उचकटून ३ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. तक्रारदार कामावरुन घरी परतले, तेंव्हा घराचे कुलूप उघडल्याचे लक्षात आले. कपाटातील दागिने लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता अधिक तपास करत आहेत.
वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली
वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसाखाली वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश करुन चोरी
दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून सराफी दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. बाजीराव रोडवरील बुधवार पेठेतील आर. जे. ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.