संग्रहित फोटो
पुणे : पुण्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता सोशल मिडीयावर झालेली ओळख दोन महिलांना चांगलीच महागात पडली असून, सायबर चोरट्यांनी या दोन महिलांची परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने तब्बल १२ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी पहिल्या घटनेत ४० वर्षीय महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या हांडेवाडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांची सोशल मिडीयाच्या माध्यमातून एका व्यक्तीशी ओळख झाली होती. चोरट्यांनी इंडोनेशियातून बोलत असल्याची बतावणी केली. महिलेचा विश्वास संपादन केला. हळू-हळू बोलणे वाढल्यानंतर त्याने मैत्रिचे जाळे टाकले. महिला विश्वासात आल्यानंतर त्याने महिलेला भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. नंतर भेटवस्तू पाठविल्या पण त्या सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केल्या आहेत, असे सांगत या महिलेला तातडीने एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदारांनी संबंधित खात्यात पैसे भरले. पण नंतर गिफ्ट मिळाले नाही. त्यांनी संपर्क केला तेव्हा मोबाइल बंद अल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत विवाहाच्या आमिषाने महिलेला ५ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने वाघोली पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसरा, तक्रारदार महिला वाघोलीत राहायला आहे. त्यांचीही संबंधित आरोपीशी सोशल मिडीयाद्वारे ओळख झाली होती. त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. या महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ५ लाख ७० हजार रुपये घेतले. वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.






