संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून, हडपसर भागात कुटूंबिय घरात झोपलेले असताना देखील एका बेडरूममधील २३ लाख ४३ हजारांच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह तिजोरी पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्हीत संशयित चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पार्थ गौंडा पाटील (वय ४४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पार्थ पाटील यांचा मगरपट्टा येथील नॉर्थ एच १०२ येथे बंगला आहे. ते कुटूंबियासह येथे राहतात. दरम्यान, ते एका बेडरूममध्ये झोपले होते. तर, दुसऱ्या मजल्यावर चोरीला गेलेली लोखंडी तिजोरी ठेवलेली होती. दरम्यान, बेडरूममध्ये शिरण्यासाठी खिडकीवरून जाता येते. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. खिडकीवरून चोरटा आत शिरला. बेडरूममध्ये ठेवलेली तिजोरी उचलून तो पसार झाला. हा प्रकार तक्रारदारांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पाहणीकरून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यात संशयित कैद झाला असून, त्यानूसार त्याचा शोध घेतला जात आहे.
तर, खराडी परिसरात एका कंपनीतून चोरट्यांनी साडे तीन लाखांचे वायर चोरून नेले आहेत. झेन वन बिल्डींगच्या शेजारी इलेक्ट्रीक कंपनीतून साडे तीन लाखांचे कॉपर वायर चोरून पोबारा केला. याप्रकरणी खराडी पोलिसांत विनय गाडगीळ (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोदंवला आहे. हा प्रकार चार दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. कंपनीकडून रविवारी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.