संग्रहित फोटो
पुणे : मोक्कासारखी कडक कारवाईचा सरधोपट झालेला पुणे पोलिसांकडून वापर अन् त्यामुळे गुन्हेगारांमध्ये मोक्काची मनात न राहिलेली भिती थेट पुणे पोलिसांनाच भारी पडू लागली असून, मोक्का कारवाईतून जामीनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने पोलिसांच्या तोंडावर मिरची स्प्रे मारून त्यांना जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याही स्थितीत त्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने चक्क मध्यरात्री पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ माजवत ठाण्याची तोडफोडही केली आहे. स्वत:वर वार करून घेत रक्तबंबाळ अवस्थेत त्याने हे दहशतीचेनाट्य निर्माण केले आहे. धक्कादायक म्हणजे, इतक होऊन पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि परिमंडळाचे प्रभारी रात्रीत एकदाही पोलिस ठाण्यात फिरकले नाही. त्यामुळे वरिष्ठांनाच गांर्भिय नसेल तर खालची अवस्था यापेक्षा वेगळी कशी राहिल, अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे. ऋषीकेश उर्फ बारक्या लोंढे (वय २२, रा. तळजाई पठार) असे या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे यासह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ऋषीकेश हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर महिला छेडछाडीसह इतर गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांना पाहिजे आरोपी होता. दरम्यान, तो तळजाई पठार येथील त्याच्या राहती घरी आल्याची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार, सहाय्यक निरीक्षक सागर पाटील तसेच अंमलदारांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याला पकडलेही, मात्र त्याने त्याच्याकडील मिरचीचा स्प्रे सागर पाटील व दोन अंमलदार यांच्या चेहऱ्यावर मारला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना सुरू झाली. तर श्वास घेण्यास देखील त्रास होऊ लागला. तेव्हा इतर अमलदार यांनी आरोपी ऋषीकेश याला पकडले. नंतर त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. नंतर त्याने प्रचंड गोंधळ घातला.
ऋषीकेश याने केलेल्या मिरची स्प्रेच्या हल्यात सहाय्यक निरीक्षक सागर पाटील, पोलिस अंमलदार योगेश ढोले, प्रदीप रेणुसे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना डोळ्यांचा प्रचंड त्रास होत असून, श्वास घेण्यासही अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
नेमक काय काय घडलं?
ऋषीकेश याने काही तरी नशा केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याला अडीचच्या सुमारास पोलीस ठाण्यात घेऊन आल्यानंतर त्याने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्याने हाताने आणि डोक्याने ठाण्याची तोडफोड केली. मोठ-मोठ्याने आरडाओरडा केला. प्रचंड गोंधळ घालत स्वत:ला जखमा करून घेतल्या. तो रक्तबंबाळ झालेला असतानाही तो या अवस्थेत पोलिस ठाण्यात प्रचंड गोंधळ घालून दहशतीचे नाट्य निर्माण करत राहिला. पोलिसांना आरोपीला काबूत ठेवताना अक्षरशः नाकीनऊ आले. यावेळी आरोपीने पोलिसांनाच धमकी देत, “तुमच्या घरात घुसून मर्डर करीन,” अशी खुलेआम धमकीही दिली. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऋषीकेशवर मोक्का कारवाई
गेल्या काही वर्षात पुणे पोलिसांनी मोक्कांची शतकी खेळी केली. सरधोपट मोक्का लावले गेले. यातील ९०० गुन्हेगार हे आता जामीनावर आहेत. त्यांची शहरात दहशत आहे. मोक्कासारख्या गुन्ह्यात जामीन मिळत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. हे गुन्हेगार आता परिसरातील दहशतीसोबतच पोलिसांसोबत देखील वादविवाद घालत असून, प्रसंगी पोलिसांवर हल्ला करू लागले आहेत. ऋषीकेशवर देखील मोक्का कारवाई केली होती. त्यातूनही तो न्यायालयात पोलिसांवरच अश्लील आरोप करत या गुन्ह्यातून जामीनावर आला. नंतर तो दोन गुन्ह्यानंतर पाहिजे आरोपी होता. मोक्का कारवाईतून जामीन मिळवून त्याच्या मनात एकप्रकारे पोलिसांची भितीच गेल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पोलिस दलात नाराजी नाट्य..!
पोलिस ठाण्यात प्रचंड गोंधळ सुरू असताना आणि नंतरही वरिष्ठ अधिकारी फिरकलेच नाही. त्यांना घटनेचे गांर्भियच नाही असेच यावरून दिसत असल्याची प्रतिक्रिया काही पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलिस दलात नाराजी नाट्य दिसून आले. फक्त ‘काम करा, काम करा’चे फर्मान सोडायचे अन् ऐनवेळी दुर्लक्ष करायचे असाच काही हा प्रकार असल्याचेही मत काहींनी व्यक्त केले. गंभीर घटनेनंतर देखील परिमंडळाचे पोलिस उपायुक्त, ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यापैकी कोणीही घटनास्थळी न पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.