संग्रहित फोटो
पुणे : राज्यात पुन्हा एकदा हायप्रोफाईल अपघाताचे प्रकरण समोर आले असून, पानशेत-पुणे रोडवरील मनेरवाडी गावाजवळ उलट्या दिशेने आलेल्या भरधाव फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात वकिलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून चालक पसार झाले आहे. अनिकेत अरुण भालेराव (वय ३५, रा. वरदाडेवाडी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या वकिलांचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काका शांताराम भालेराव यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भालेराव हे वकील होते. ते शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत. बुधवारी ते साडे चारच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी खानापूर येथे गेले होते. पानशेत- पुणे रोडवरील मनेरवाडी येथील तारांगण हॉटेल समोर आले असताना उलट्या दिशेने भरधाव आलेल्या फॉर्च्युनर कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अनिकेत हे गंभीर जखमी झाले. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून शहरातील एका रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान नातेवाईकानी कार चालक दारू पिलेला असावा असा आरोप केला आहे.
त्या अपघाताची आठवण
गेल्या वर्षी (१९ मे ) पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत आलिशान कार पळवत आयटी इंजिनिअर तरुण-तरूणींना उडवले होते. अल्पवयीन धनिक पुत्राला वाचवण्यासाठी झालेला खटाटोप आणि रक्तबद्दल यामुळे हे प्रकरण मोठे गाजले होते. अद्यापही यातील काही जण कारागृहात आहेत. बुधवारी झालेल्या अपघातामुळे पुन्हा या अपघाताची आठवण सर्वाना झाली.