पुणे : नवी पेठेत चोरट्यांनी बंगला फोडून चोरट्यांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर सुधाकर देशमुख (वय ४६, रा. आनंद बंगला, लक्ष्मीकृपा सोसायटी, नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देशमुख कुटुंबीय मंगळवारी रात्री बाणेर येथील नातेवाईकांकडे गेले होते. ते राहण्यास नवी पेठेतील रामबाग कॉलनीत आहेत. बुधवारी सकाळी देशमुख कुटुंबीय नातेवाईकांकडून परतले. तेव्हा दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ४ लाख ८६ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक खाडे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस ‘अॅक्शन मोडवर’; बेशिस्तपणे वाहन चालविल्यास आता थेट…
पुण्यातील या भागात घरफोड्या
घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, गेल्या काही दिवसाखाली राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालकांच्या मेव्हण्याचा बंद घर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासोबतच आणखी दोन फ्लॅटदेखील फोडण्यात आले आहेत. तर चोरट्यांनी शहरातील विश्रांतवाडी, धनकवडी तसेच मार्केटयार्ड परिसरातही फ्लॅट फोडले आहेत. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाणेर भागात मध्यरात्री अमोल बाळासाहेब लोखंडे (वय ३४) तसेच मनोहर चौधरी (रा. बाणेर गावठाण, भैरवनाथ मंदिराजवळ) यांचेही सोमवारी मध्यरात्री फ्लॅट फोडण्यात आले आहेत. याप्रकरणात बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. जवळपास १० ते १२ तोळे सोने व रोकड चोरून गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
निवृत्त पोलीस महासंचालक यांचा मेव्हणा चतु:श्रृंगी परिसरात राहतात. ते बाहेर गावी असतात. अधून-मधून येतात. त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी तो सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच औंधमधील लोखंडे व चौधरी यांचाही फ्लॅट फोडला आहे. यासोबत विश्रांतवाडीत साप्रस पोलीस चौकीजवळील एका सोसायटीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून विश्रांतवाडी पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. १९ ते २२ नोव्हेंबर या काळात ही घटना घडली. तक्रारदारांच्या नातेवाईकांच्या घरी लग्नकार्य होते. त्यासाठी तक्रारदार कुटुंबीयांसह बीडला गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेशकरत दोन लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार लग्नावरून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.