संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद घातला असून, बिबवेवाडीत पहिल्या मजल्यावरील घराचे कुलूप उघडत असताना चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासोबतच शहरातील वेगवेगळ्या भागात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आहे. शहरात दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळ्या पुन्हा ॲक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ७४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार या बकुळा हॉलजवळ विघ्नहर्ता क्लासिक इमारत आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर तक्रारदारांचा फ्लॅट आहे. बुधवारी सायंकाळी त्या कुलूप लावून त्या बाहेर गेल्या होत्या. सव्वा सहाच्या सुमारास त्या परत आल्या. पहिला मजला चढून त्या फ्लॅटसमोर गेल्या. त्या दाराचे कुलूप उघडत असतानाच चोरट्यांनी पाठिमागून येऊन त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. चोरटा धावत खाली आला आणि दुचाकी घेऊन उभारलेल्या साथीदारासोबत पसार झाला. महिलेने आरडाओरडा केला. परंतु, चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला.
दुसरी घटना शिवाजीनगर भागात घडली असून, याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात ५४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार या शिवाजीनगर येथे राहण्यास आहेत. त्या गजानन महाराज (शेगाव) मठाच्या समोरील रस्त्यावरून मंगळवारी रात्री सातच्या सुमारास पायी चालत जात होत्या. तेव्हा दुचाकीवर पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत.
तर, तिसरी घटना नगर रस्त्यावरील चंदननगर भागात घडली असून, ५९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार या मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास नगरकडून पुण्याकडे येत असताना लुंकड कार डेकोर दुकानासमोर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार व्ही. बी. भोसले हे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : जेलमधून सुटका हाेताच मिरवणूक भोवली; पोलिसांनी परत केली रवानगी
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह ?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या अॅक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.