सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या रावेत येथील फर्निचर व्यावसायिक गोळीबार प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तब्बल २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कुख्यात बिश्नोई गँगच्या नावाने हा थरारक गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी थेट उत्तराखंडमध्ये धडक कारवाई करत, बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या तीन सराईत गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली होती.
हरियाणा कनेक्शन अन् उत्तराखंडमध्ये बेड्या!
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने उत्तराखंडमध्ये अत्यंत धाडसी आणि गुप्त मोहीम राबवून ही कारवाई केली. प्रवीण राम निवासे (वय २३, रा. हरियाणा ), पंकज कुलदीप रहाठी (वय २१, रा. हरियाणा), सागर अजय पाल (वय २१, रा. हरियाणा) या तिघांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी कुख्यात अराजू बिश्नोई याच्या थेट संपर्कात होते. अटक करण्यात आलेल्या या तिघांना बुधवारी रात्री उशिरा पुण्यात आणले आहे.
काही दिवसांपूर्वी रावेत येथील एका फर्निचर व्यावसायिकावर दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपींनी थेट सोशल मीडियावर पोस्ट टाकत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या गुन्ह्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गोळीबारानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी उत्तराखंडमध्ये लपून बसल्याची खात्री पटताच, पोलिसांनी तिथे जात अत्यंत शिताफीने सापळा रचून या तिघांना जेरबंद केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई






