चुकून पाय लागला म्हणून घेतला जीव (संग्रहित फोटो)
नागपूर : पान टपरीवर सिगारेट ओढत असलेल्या तरुणाच्या पायाला पाय लागल्याने मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर हत्येत झाले. ही घटना मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारत फर्निचरजवळ घडली. शुभम बेसारे (वय २८, रा. शिवकृष्ण धाम, कोराडी) असे यामध्ये खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अतुल इवनाते (वय २५) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलासह आठ आरोपींपैकी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी दाहेगाव निवासी हर्षल नारे (वय २४), जरीपटका निवासी व्यंकटेश बादल (वय २२) आणि मयंक मनपे (वय २१) यांना अल्पवयीन मुलासह अटक केली आहे. पोलिस कोराडी निवासी तेजस ऊर्फ कोला झोडापे (वय २२), प्रिन्स ऊर्फ त्रिशित चावरे (वय २०), जरीपटका निवासी मोहित धीरज रामटेके (वय २२) आणि पीयूष अतुल डोंगरे (वय २०) यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मजुरी करत होता. मंगळवारी रात्री सुमारे दीड वाजता शुभम आणि अतुल नागपूर-कोराडी सर्व्हिस रोडवरील भारत फर्निचरजवळच्या पानटपरीवर सिगारेट ओढत होते. एनपीडीएच्या गुन्ह्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेला तेजस, मित्र हर्षल आणि पीयूष यांच्यासोबत तिथे उभा होता. सिगारेट ओढत असताना अतुलचा पाय तेजसला लागला. ज्यामुळे त्यांच्यात वाद झाला. पण, नंतर यातील सर्व शांत राहिले.
चाकू आणि काठ्यांनी हल्ला
परिस्थिती शांत झाली असे समजून शुभम आणि अतुल घरी परतत होते. परंतु, मनात वैर असलेल्या आठ जणांनी त्यांच्यावर दगड, धारदार चाकू आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शुभमचा मृत्यू झाला.
मध्यस्थीच्या प्रयत्नात अतुलही गंभीर
मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना अतुलही गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. अतुलची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
किरकोळ कारणातून वृद्धाची हत्या
सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून वृद्धाचे दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शहरातील वसंतदादा साखर कारखान्याच्या पाठीमागील बैलगाडी तळावर घडली. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.
Twisha Sharma: पुन्हा पोस्टमॉर्टमच्या मागणीला कोर्टाचा नकार; याचिका फेटाळली, आता मृतदेह…






