तळवडे आयटी पार्कजवळ दोघांची हत्या (File Photo : Crime)
पिंपरी : तळवडे आयटी पार्क परिसरात एका ३० वर्षीय महिलेचा आणि ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात या दोघांचाही खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी ठेकेदार दत्तात्रय साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतांची नावे मंगला सुरज टेंभरे (३०, रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (५५, रा. अकोला) अशी आहेत. दोघेही तळवडे परिसरात वास्तव्यास होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. सकाळच्या सुमारास काही नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.
तपासादरम्यान, पोलिसांनी ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून सध्या साक्षीदारांचे जबाब, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन डेटा याच्या आधारे तपास सुरू आहे.
परिसरात दहशतीचे वातावरण
या घटनेनंतर तळवडे आयटी पार्क आणि आसपासच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारनंतर या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
वसईमधून धक्कादायक घटना समोर
वसईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वाढदिवसाच्या पार्टीत क्षुल्लक कारणातून वाद झाला. या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव आकाश पवार असे आहे. तर, मनोज पांडे (37 वर्ष) आणि राहुल भुरकुंड (27 वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत.