संग्रहित फोटो
पुणे : वडगाव शेरी परिसरात सराफी दुकानात खरेदीच्या निमित्ताने आलेल्या दोन महिलांनी कामगारांची नजर चुकवून तेथील ६० हजार रुपयांची सोन्याची अंगठी घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला आहे.
तक्रारदार यांचे जूना मुंढवा रस्त्यावर सावलिया ज्वेलर्स हे दुकान आहे. ते दुकानात असताना दोन महिला सोने खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांनी अंगठी दाखविण्यास सांगितले. तेव्हा तक्रारदार त्यांना वेगवेगळ्या अंगठ्या दाखवत होते. परंतु, त्यांनी तक्रारदार व इतर कामगारांची नजर चुकवून काऊंटरमधील एक सोन्याची अंगठी चोरून नेली. रात्री सोन्याची पडताळणी करत असताना हा प्रकार लक्षात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.
पादचारी तरुणाची चैन हिसकावली
स्वारगेट उड्डाणपुलाखाली मध्यरात्री दुचाकीस्वार चोरट्यांनी एका पादचारी तरुणाच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत ४१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास उड्डाणपुलाखालून जात होते. ते इलेक्ट्रिक पोल तीनजवळ आले असता पाठिमागून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील २० हजारांची सोनसाखळी हिसकावली.
एटीएमची अदला-बदल करून काढले पैसे
लष्कर परिसरात एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडील एटीएम कार्ड लबाडीच्या इराद्याने चोरून त्याद्वारे २८ हजार रुपये त्यांच्या खात्यावरून काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारस ही घटना घडली आहे.