सेल्फी घेतली अन् आत्महत्या केली; पतीदेखत पत्नीने नदीत उडी मारली (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून आत्महत्या होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता पतीच्या देखत एका महिलेने थेट नदीत उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्हातील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
निर्माल्य नदीत टाकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने सर्वात आधी सेल्फी घेतली. त्यानंतर निर्माल्य नदीमध्ये टाकल्यानंतर अचानक त्या महिलेने नदीमध्ये उडी घेतली. ही घटना रविवारी घडली असून, सोमवारी त्या महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. विजय साकोरे आणि ज्ञानेश्वरी दोघे रामटेकच्या काचूरवाही गावातील रहिवासी आहेत. दोघेही नागपूर येथून गावाला जाण्यासाठी निघाले होते.
हेदेखील वाचा : पंढरपूर हादरलं ! पत्नीने मुलांसह आत्महत्या केल्याचे समजताच पतीनेही घेतला गळफास; परिसरात एकच खळबळ
नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेरी पुलाजवळ दोघेही थांबले. निसर्गरम्य वातावरण असल्याने दोघांनी तिथे सेल्फी देखील काढला. त्यानंतर ज्ञानेश्वरी निर्माल्य नदीत टाकण्यासाठी पुढे गेली. त्यानंतर अचानकच ज्ञानेश्वरीने नदीत उडी घेतल्याची माहिती, ज्ञानेश्वरीचे पती विजय साकोरे यांनी पोलिसांना दिली.
पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि शोधमोहीम सुरू केली असता, सोमवारी ज्ञानेश्वरीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. या महिलेने पतीदेखत नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.
पुण्यात महिलेची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) तसेच विष्णु देशमुख (वय ६) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.