पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चक्क पतीला संपविले
अकोला : दारूड्या पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. पत्नीने पतीच्या छळाला कंटाळून त्याला कायमचे संपवण्याचे ठरवले. त्यानुसार, ही हत्या झाली. ही घटना जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंबिकानगर परिसरात घडली आहे. तब्बल 26 दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
रमेश सातरोटे (वय 52) असे मृताचे नाव असून, शीला सातरोटे असे मारेकरी पत्नीचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. 30 एप्रिलला अकोल्यातील जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील अंबिकानगर येथील रहिवासी शीला सातरोटे (वय 42) यांनी तक्रार दिली की, पती रमेश सातरोटे यांचा दारूच्या नशेत जमिनीवर कोसळून अचानक मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला होता. अखेर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर धक्कादायक खुलासे उघड झाले.
हेदेखील वाचा : Pune Crime : शिंदेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने पुतण्या- पुतणीवर रोखली बंदूक, नेमकं काय प्रकरण?
दरम्यान, वैद्यकीय अहवाल व पोलिस तपासाअंती सदर घटना ही आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचे 26 दिवसांनंतर समोर आले. पोलिसांना सुरुवातीपासूनच मृत रमेशच्या पत्नीवर संशय होता. पोलिसांनी खोलात जाऊन तपास करून सबळ पुरावे प्राप्त केले. मृतकाची पत्नी शीला तसेच तिचा लहान मुलगा यांच्याविरुध्द पुरावे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या.
पोलिसी खाक्या दाखवताच हत्येची कबुली
पोलिसांच्या अथक प्रयत्न आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी रमेशची हत्या केल्याची कबुली दिली. मारेकरी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. पत्नी शिला हिला अकोला जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, पोलिस तिची कोठडी मागणार आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नीलेश लेव्हलकर यांनी केला.
शवविच्छेदनाला केला होता विरोध
रमेशच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी शिला हिने पतीच्या मृतदेहावर शवविच्छेदन प्रक्रिया करण्यासाठी प्रखर विरोध केला होता. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा जोरकस प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी रमेशच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्याचवेळी पोलिसांना मृत रमेशच्या नातेवाईकांवर संशय आला होता. मात्र, पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवाल हाती येताच संपूर्ण प्रकरणाचे बिंग अखेर फुटले.