संग्रहित फोटो
तासगाव : तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये मटका आणि जुगारामध्ये तरुणाई बिघडत चालली आहे. तासगाव शहरातील बागवान चौक, विटा नाका, गोटेवाडी रस्ता, कॉलेज चौक या भागात तर तालुक्यातील सावळज, मनेराजुरी, मांजर्डे, येळावी भागात मटका आणि जुगाराचे अड्डे चांगलाच रंग धरु लागले आहेत. तरुणांपासून वयस्करांपर्यंत प्रत्येकजण यामध्ये भरडला जात असून, ‘मटकाकिंग मालामाल आणि आकडेबहाद्दर कंगाल’ अशी अवस्था झाली आहे. मागील दोन वर्षात केवळ जुगार आणि मटक्याच्या केवळ ७५ कारवाई तासगाव तालुक्यामध्ये केल्या आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रमुख टोळींमधील चालकांचा कुठेही समावेश नसल्याने अवैध धंद्यावरची तासगाव पोलिसांची भिस्त हरवली आहे का?, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.
आमदार रोहित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर या धंद्यांना चाप लावला होता. पोलिस प्रशासनाला पाटील यांनी सक्त सुचना केल्यानंतर हे धंदे अवघा महिनाभर बंद होते, मात्र त्यानंतर हे धंदे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे. मटका आणि जुगार खेळून रोजंदारीवर कामाला जाणारांची घरे उद््ध्वस्त होत असताना आमदार रोहित पाटील यांची या अवैध धंद्याविरोधात भुमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
अवैध धंदे बंद करण्याची आपेक्षा
माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी राज्यातील अवैध धंद्यांवर जरब बसवली होती. तासगाव तालुक्यातून त्यांनी अवैध धंदे हद्दपार केले होते. त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्याकडून देखील हे अवैध धंदे बंद करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तासगाव शहरातील सांगली नाका, बागवान चौक, मुस्लिम मोहल्ला, कॉलेज चौक, विटा नाका, गोटेवाडी रस्ता अशा प्रमुख चौकात सुरू असलेले हे बेकायदेशीर उद्योग रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. तरुण पिढी या धंद्यांच्या आहारी जाण्यापासून पोलिसांनी रोखण्याची गरज आहे.
सत्ताधारी पक्षाचे राजकीय पदाधिकारीचं चालवतात अड्डे
तासगाव शहरातून महिन्याला ८० लाख ते १ कोटींचा मटका आणि जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक आकडा गोपनीय सुत्रांकडून मिळाला आहे. तर यामध्ये राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे काही राजकीय पदाधिकारी देखील हे अड्डे चालवत असल्याचे सांगितले जाते. तर तासगाव पोलिसांकडून केलेल्या कारवाईचा आणि संशयितांचा आलेख पाहिला तर हा कारवाईचा केवळ फार्सच ठरत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात मटका चालवणारे बुकी हे या गुन्हा दाखल झालेल्या यादीत नसल्याचे दिसून येते तर दुसरीकडे मोठी रक्कम सापडली जात असताना देखील किरकोळ कारवाई दाखवून ‘पंटर’वर गुन्हे दाखल केले जात असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
कारवाई आणि पंटर
अनेक ठिकाणी अवैध धंद्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र प्रत्यक्षात जो मटका किंवा जुगार घेत असतो त्यावर कारवाई होताना दिसत नाही. उलट त्याच्याकडून एखादा पंटर दिला जातो. हा पंटर म्हणजे एखाद्या गरजवंताना त्याच्या नावावर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी थोडे पैसे देऊन त्याच्या परिस्थितीचा फायदा घेतला जातो. तासगाव तालुक्यात जुगार, मटका या कारवाईमध्ये अनेकवेळा हा प्रकार दिसून येतो.
आपण पोलिसांना सूचना करुन अवैध धंदे बंद केेले होते. मात्र दोन महिन्यानंतर हे अवैध धंदे करणारे टोळके पुन्हा तोंड वर काढू लागले आहे. शहरातील तरुणाई चुकीच्या मार्गाने जावू नये, यासाठी आपण प्रयत्न करतोय. तासगाव शहरासह तालुक्यात आणि कवठे महांकाळ तालुक्यात काही राजाश्रीत लोक अवैध धंदा चालवून तालुक्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. पोलिसांसमोर या टोळक्यावर कारवाई करण्याचे आव्हान आहे. पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास तासगाव व कवठेमहांकाळ पोलिसांविरोधात मला रस्त्यावर उतरावे लागेल तसेच सांगली पोलिस मुख्यालयासमोर मी उपोषणास बसणार आहे.
– रोहित आर. आर. पाटील, आमदार
तासगाव तालुक्यामध्ये अवैध धंदे पूर्ण बंद आहेत. तरीही कोणीही असे कृत्य करत असेल तर पोलिस प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, अवैध धंदे करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– सोमनाथ वाघ, पोलिस निरीक्षक, तासगाव पोलिस ठाणे.