भाजप नेत्याच्या घरावर EDची छापेमारी; 15 तास चौकशी
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने महाराष्ट्रातील नागपूर, मुंबईसह दिल्लीत छापेमारीची कारवाई केली. 20 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या कथित बँक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अमटेक प्रवर्तकांविरुद्ध मनी लॉड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ही छापेमारी झाली.
अरविंद धाम, गौतम मल्होत्रा यांच्यासह अमटेक ग्रुप आणि त्याच्या संचालकांवर छापे टाकण्यात येत आहेत. त्यानुसार, ईडीने मुंबई, नागपूर आणि दिल्ली-एनसीआरमधील सुमारे 35 ठिकाणी झडती घेतली. गुरुवारी सकाळपासून दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही सक्तवसुली संचालनालयाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितल्याचे म्हटले जात आहे. या फसवणुकीमुळे सरकारी तिजोरीचे सुमारे 10 हजार ते 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.