महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार आहे. तर परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी तयार करून अनेक नेते आपले नशीब आजमवणार आहेत. सर्व पक्षांच्या स्वतंत्र आणि एकत्रित प्रचार सभा होत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जाहीरनामा जनतेसमोर मांडला आहे. दरम्यान आज राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभा पार पडल्या. तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा पार पडली. दरम्यान राज्याच्या राजकारणात आज काय काय घडले त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचे महत्वाचे भाष्य
महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वीजमाफी, मुलींना मोफत शिक्षण, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर फ्री या योजनांचा समावेश होतो. या सर्व योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये खर्च येत होता. महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी तेवढी क्षमता होती. कारण साडेसहा लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज याचं रिपेमेंट दरवर्षी करावं लागतं.
हेही वाचा: Ajit Pawar : ‘… ते तर आता शक्यच नाही’; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं मोठं विधान
विजय शिवतारे यांच्याकडून आचारसंहितेचा भंग – रोहन सुरवसे पाटील
पुरंदर विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आचार संहितेचा भंग केल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचार संहितेच्या काळात बॅनर लावणे तसेच होर्डिंग लावणे यावर राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना प्रतिबंध आहे. त्यामुळे या संदर्भातील व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार असा सवाल सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: Maharashtra Election: “आचार संहितेच्या काळात बॅनर… “; रोहन सुरवसे पाटील यांची शिवतारेंवर कारवाईची मागणी
एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी आहे. अडीच वर्षात त्यांनी केवळ विकासकामांना स्थिगिती देण्याचं काम केलं, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकायला निघाले त्यावेळीच आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं. तानाजी सावंत त्यावेळी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. तसंच उस्मानाबादच नामकरण धाराशिव करण्याच भाग्य मला मिळालं. पूर्ण बहुमताचं सरकार आणल्यानंतर उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छञपती संभाजीनगर नामकरण करून बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केलं आहे, असे शिंदे म्हणाले.
हेही वाचा: Eknath Shinde : ‘उद्धव ठाकरेंची मशाल घराघरात आग लावणारी’; धाराशिवच्या सभेत एकनाथ शिंदेंचा घणाघात
धुळ्यातून पंतप्रधान मोदींची महाविकास आघाडीवर टीका
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या प्रत्येक सदस्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. महाराष्ट्राचा विकास आम्ही पुढे नेणार आहोत. महाराष्ट्राला आवश्यक असलेले सुशासन फक्त महायुतीच देऊ शकते, त्यातून विकास साध्य आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत लढत सुरू आहे. त्यांनी महाविकास आघाडी ही चालक आणि चाके नसलेले हे केवळ चालणारे वाहन आहे. अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी आता महिलांवर कसा अत्याचार केला आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कसली शिवीगाळ, कसल्या कमेंट्स, महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न. आघाडीच्या या कृत्याला महाराष्ट्रातील कोणतीही माता-भगिनी कधीही माफ करू शकत नाही. काँग्रेस सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद करेल, याविरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसला ही योजना बंद करायची आहे. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा: Narendra Modi Dhule Speech: महाविकास आघाडी ही चालक आणि चाके नसलेली गाडी; धुळ्यातून मोदींनी तोफ डागली
अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाष्य
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीचा मुख्यमंत्रीपदासाठी कोणता चेहरा असेल, याबाबत जाहीर सभेत संकेत दिले आहे.या सभेत अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर टीका केली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. भाषण करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. म्हणून, प्रत्येक दिवशी आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले.
फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर कडक शब्दांत टीका करत त्यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक” असे संबोधले.तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरित होत असल्याची खोटी माहिती पसरवून विरोधक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अजूनही पहिली पसंती आहे आणि संपूर्ण भारतातील ५२% विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केली आहे.