(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
रिअॅलिटी शोच्या दुनियेत आता एक नवा आणि वेगळा प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विश्वास, मैत्री, रणनीती आणि विश्वासघात यांची गुंतागुंत उलगडणारा ‘अलायन्स’ हा शो 26 जूनपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्राइम व्हिडिओने नुकताच या शोचा दमदार ट्रेलर प्रदर्शित केला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
या शोचे विशेष आकर्षण म्हणजे अभिनेता कुणाल खेमू याचे सूत्रसंचालन. पहिल्यांदाच रिअॅलिटी शो होस्ट करत असलेला कुणाल या खेळातील प्रत्येक डाव, प्रत्येक नातं आणि प्रत्येक विश्वासघाताचा साक्षीदार असणार आहे. त्याच्या खास शैलीमुळे शोला वेगळी रंगत मिळणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.
‘अलायन्स’मध्ये स्पर्धक जोड्यांच्या स्वरूपात खेळात प्रवेश करतील. मात्र, खेळ जसजसा पुढे सरकेल तसतसे नात्यांचे रंग बदलताना दिसतील. एकमेकांवर विश्वास ठेवणारे साथीदार कधी प्रतिस्पर्धी बनतील आणि कोण कोणाचा डाव उलथवेल, याचा अंदाज बांधणे कठीण असणार आहे.
View this post on Instagram
या शोमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी होत आहेत. अभिनेता रवि किशन आणि त्यांची मुलगी रीवा किशन, कुशल टंडन-अर्सलान गोनी, डेजी शाह-झैद दरबार, मिनी माथुर-निखिल चिनापा यांसारख्या जोड्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय डिजिटल आणि गेमिंग विश्वातील अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्त्वेही या स्पर्धेत आपलं नशीब आजमावणार आहेत.
शारीरिक आव्हाने, मानसिक कसोटी, गुप्त मोहिमा आणि सतत बदलणारी समीकरणे यामुळे ‘अलायन्स’ हा केवळ रिअॅलिटी शो नसून नात्यांचा आणि विश्वासाचा थरारक खेळ ठरणार आहे. प्रत्येक दिवस नवा ट्विस्ट घेऊन येणार असून, शेवटपर्यंत कोण टिकणार याची उत्सुकता कायम राहणार आहे






