(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आजच्या काळात पाणी ही सहज उपलब्ध गोष्ट असली, तरी इतिहासात असा काळ होता जेव्हा जन्माच्या आधारावर लाखो लोकांना सार्वजनिक पाण्यालाही स्पर्श करण्याचा अधिकार नाकारला जात होता. या अन्यायाविरुद्ध 20 मार्च 1927 रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक न्यायाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवी प्रतिष्ठा, समानता आणि स्वाभिमानासाठी पेटलेला संघर्ष होता.
या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 23 जून रोजी रात्री 8 वाजता माटुंगा येथील यशवंतराव नाट्यमंदिरात होणार आहे.
नाटकाचे लेखक राजकुमार बडोले यांनी सांगितले की, “इतिहास केवळ स्मरणात ठेवण्यासाठी नसतो, तर त्यातून वर्तमानाला दिशा मिळावी यासाठी असतो. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा विचार आणि त्यामागील सामाजिक जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या नाटकामागचा मुख्य उद्देश आहे.”
दिग्दर्शक प्रशांत निगडे म्हणाले, “चवदार तळे सत्याग्रह हा केवळ ऐतिहासिक प्रसंग नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रेरणास्थान आहे. या नाटकातून त्या संघर्षाची तीव्रता आणि त्याचा आजच्या समाजाशी असलेला संबंध प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी. प्रस्तुत या नाटकाची निर्मिती शारदा राजकुमार बडोले यांनी केली असून गणेश कृ. मोडक सहनिर्माते आहेत. लेखन आणि गीतरचना राजकुमार बडोले यांनी केली आहे. संगीत दिग्दर्शन मंदार देशपांडे, वेशभूषा सुप्रिया बर्वे, रंगभूषा मिलिंद कोचरेकर आणि नेपथ्य सुशील पांचाळ यांनी सांभाळले आहे.
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन कालखंडांचा प्रभावी संगम. एका बाजूला महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास उलगडतो, तर दुसऱ्या बाजूला त्या इतिहासाकडे पाहणारी आजची पिढी दिसते. त्यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या संघर्षाचा अर्थ आजच्या समाजासाठी काय आहे, हा प्रश्न नाटक प्रेक्षकांसमोर उभा राहणार आहे.
या नाटकात सशांक पांचाळ, मयुरेश मढवी, मयुरी निकम, तेजस राजे, राजू भिलारे, अजित रांजणे, दत्ता शेट्ये, अमोल जाधव, सुबोध हर्डीकर, सायली नंदा, प्रांजल परब, महादेव जाधव, मृणाल खिस्मतवार, प्रेम जेटीथोर आणि संजना हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत.






